राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणक्यात विजय नोंदविल्यानंतर आज संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2014, 06:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणक्यात विजय नोंदविल्यानंतर आज संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. हा आनंद द्विगुणित झाला जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विजयासाठी शिवसेनेचं आणि उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं.
आज, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पुष्पगुच्छ पाठवून त्यांचं अभिनंदन केलं. शुक्रवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक निकालात शिवसेनेनं तब्बल 18 जागांवर विजय नोंदवलाय.
महत्त्वाचं म्हणजे, मनसेनं लोकसभा निवडणुकीसाठी उभे केलेले दहा उमेदवार हे इतर पक्षांविरुद्ध नव्हे तर शिवसेनेच्या विरुद्ध लढवत असल्याचं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं होतं. कारण, मनसेच्या निवडणूक लढवणाऱ्या दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवार हे शिवसेनेचा उमेदवार उभ्या असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते... भाजपला मनसेनं यासाठी झुकतं माप दिल्याचं स्पष्ट दिसून आलं होतं. याच कारणावरून काही काळासाठी युतीतही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, राज्यात महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज मातोश्रीवर चांगलीच लगबग होती. हा विजय साजरा करण्यासाठी मातोश्री सजलीय. विजयी उमेद्वार आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला येतायत. सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केलीय. शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय. अनंत गिते, राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ या सगळ्या निवडून आलेल्या खासदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना शिवसैनिकांची आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.