www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्मृति ईराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवल्यानंतर त्यांच्या शिक्षणावरून वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं स्मृति ईराणींच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर भाजपनं पलटवार करत सोनिया गांधींच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केला. खरं तर मोदींच्या मंत्रीमंडळात 2 मंत्री 12वी पास, 5 मंत्री 10वी आणि 1 मंत्री पाचवी पास आहे. अशात यांच्याबाबत प्रश्न का नाही विचारला जात आहे? हा प्रश्न उपस्थित होतोय.
मोदींच्या कॅबिनेटमध्ये उमा भारती सर्वात कमी शिकलेल्या मंत्री आहेत. त्यांनी फक्त पाचवीपर्यंत शिक्षण घेतलंय. अनंत कुमार, अशोक गजापती राजू, अनंत गीते, हरसिमरत कौर बादल, आणि विष्णूदेव साई दहाव्या वर्गापर्यंत शिकले. तर मनेका गांधी आणि स्मृति ईराणी 12वीपर्यंत... गंमत म्हणजे स्मृति ईराणी आणि मनेका गांधी दोघींनी मॉडेलिंगसाठी आपलं शिक्षण सोडलं होतं.
ही झाली एक बाजू... दुसरी बाजू म्हणजे मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व मंत्रीमंडळातील सर्वाधिक शिकलेले खासदार आहेत. मोदींच्या 45 मंत्र्यांपैकी अधिकाधिक ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. तर तीन पीएचडी आणि एक एम. फील झालेला मंत्री. एवढंच नव्हे तर मोदींचा एक मंत्री एमबीबीएस डॉक्टर आणि एक इलेक्ट्रॉनिक इंजीनिअर सुद्धा आहे. सर्वाधिक मंत्री हे लॉ ग्रज्युएट आहेत.
मोदी कॅबिनेटचे 16 मंत्री हे लॉ ग्रॅज्युएट आणि लॉमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. मंत्र्यांमध्ये 14 लॉ ग्रॅज्युएट, 2 लॉ पोस्ट ग्रॅज्युएट, 8 ग्रॅज्युएट, 5 पोस्ट ग्रॅज्युएट, 3 पीएचडी, 1 एम फिल, 1 एमबीबीएस, 1 इंजीनिअरही सहभागी आहे. नजमा हेपतुल्ला, जनरल व्ही.के.सिंह आणि संजीब बालियान हे पीएचडी आहेत. तर निर्मला सीतारमन या एम.फिल. आहेत. सोबतच दिल्लीचे खासदार आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन एमबीबीएस डॉक्टर आहेत. तर पूर्वांचलचे खासदार मनोज सिन्हा हे इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये एमटेक आहेत. आता यावरही चर्चा होऊन जावू देत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.