`एम` फॉर मोदी आणि... `एम` फॉर मुस्लिम?

सध्या `एम स्केअर`ची जोरदार चर्चा सुरू आहे... मोदींचा `एम प्लान`... भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २०१४चं सर्वात मोठं राजकीय युद्ध जिंकण्यासाठी एक खास `एम प्लान` तयार केलाय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 23, 2014, 01:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या `एम स्केअर`ची जोरदार चर्चा सुरू आहे... मोदींचा `एम प्लान`... भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २०१४चं सर्वात मोठं राजकीय युद्ध जिंकण्यासाठी एक खास `एम प्लान` तयार केलाय. मोदींचा हा प्लान वाराणसीसाठी आहे. मात्र, मुस्लिमांना जिंकण्यासाठी मोदींचा `एम प्लान` यशस्वी होणार का हा खरा प्रश्न आहे?
वाराणसीच्या रणांगणात उतरलेले मोदी २४ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, यापूर्वीच त्यांनी मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी जोरदार रणनिती आखलीय. गंगा-जमुनाच्या संस्कारांवर श्रद्धा असलेल्या या शहरातले मुस्लिमदेखील आपलंसं करतील असा विश्वास मोदींना आहे.
वाराणसीच्या कुरूक्षेत्रावरचं युद्ध मुस्लिम मतांच्या चक्रव्युवमध्ये अडकलंय आणि याची पूर्ण जाणीव भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना आहे. वाराणसीत १६ लाख मतदार आहेत. यात तब्बल तीन लाख मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. त्या खालोखाल सव्वा तीन लाख वैश्य असून ब्राम्हण मतदारांची संख्या दोन लाख आहे. सव्वा लाख कुर्मींची मते आहेत, तर सव्वा लाख यादवांची आणि ९० हजार दलितांची मते आहेत. या सर्वांची एकूण संख्या तब्बल ८३ टक्क्यांच्या आसपास आहे. उरलेल्या १७ टक्क्यांत राजपूत, कोइरी, कायस्थ आणि भूमिहारांचा समावेश आहे. राजकीय विश्लेषकांच्या मतदारसंघातले १९ टक्के मुस्लिम वाराणसीच्या जय-पराजयाचं गणित ठरवतात.
केवळ एका समाजाच्या मतांनी हे युद्ध जिंकता येणार नसल्याची पुरेपूर कल्पना मोदींना आहे. त्यामुळंच मोदी मुस्लिमांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताच्या पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मोदींना वाराणसीत विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवण्याची गरज आहे. त्यामुळंच स्वत:ला वाराणसीसोबत जोडून जास्तीत जास्त मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी मोदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय.
स्वत:ला आधी वाराणसीसोबत जोडणं आणि आता मुस्लिमांशी... म्हणजे सत्तासंघर्षात प्रसिद्धी आणि मतांवर थोडाही परिणाम होणार नाही, याची मोदी पुरेपूर काळजी घेत आहेत. मात्र, मोदी मुस्लिमांच्या बाबतीत एवढे निश्चिंत कसे? खरा प्रश्न आहे.. .अखेर वाराणसीच्या मुस्लिमांचं मन जिंकण्यासाठी मोदी कोणती खास खेळी खेळणार? याकडेच आता देशाचं लक्ष लागलंय

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.