उत्तर पश्चिम मुंबई : कामतांना कोण पछाडणार?

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विद्यमान खासदार गुरुदास कामत यांना शिवसेनेचे गजानन किर्तीकर, मनसेचे महेश मांजरेकर आणि आप मयांक गांधी यांच्यात सामना रंगणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2014, 10:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विद्यमान खासदार गुरुदास कामत यांना शिवसेनेचे गजानन किर्तीकर, मनसेचे महेश मांजरेकर आणि आप मयांक गांधी यांच्यात सामना रंगणार आहे. पाच वेळा गुरुदास कामत मुंबईतल्या विविध मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेलेत तर मुंबई उत्तर-पश्चिम मधून ते दुसऱ्यांदा नशीब आजमावतायत.  
 
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असलेल्या गुरूदास कामत यांनी प्रचारात आघाडी घेतलीय. निवडणुकांची तारीख घोषित होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत त्यांनी तीन वेळा मतदारसंघ पदयात्रांनी पिंजून काढलाय. मतदारसंघातल्या गल्लीबोळात ते फिरतायत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं मतदार उत्सफुर्तपणे स्वागत करत आहेत. मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा गुरूदास कामत करत आहेत.

उत्तर पश्चिम मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघापैकी ४ ठिकाणी काँग्रेसचे तर दोन ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात परप्रांतिय आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. २००९ मध्ये ती एकगठ्ठा मते कामतांना पडली होती. तसंच शिवसेना आणि मनसेच्या मतविभागणीचा कामतांना फायदा झाला होता. यावेळीही शिवसेना आणि मनसे उमदावर रिंगणात असल्याचा कामतांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ मतविभागणीमुळे नाही तर आपल्या कामाच्या जोरावर मते मागत असल्याचा दावा कामत करत आहेत तर मुंबईतील मराठी मतं आता काँग्रेसच्या मागे उभी राहतात, असा दावाही ते करत आहेत.
मराठी मतांची विभागणी, परप्रांतिय आणि मुस्लिम मते ही कामतांची जमेची बाजू आहे. तर मोदींची लाट ही त्यांच्यासाठी अडचणीची बाब आहे. यात आता कोण सरस ठरतं, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.