www.24taas.com, झी मीडिया, नंदुरबार
संपूर्ण राज्यच लक्ष लागलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराने आजोबांचं वय झाल त्यांना आता टेन्शन नको पेन्शन द्या, असा प्रचार सुरु करून काँग्रेसची झोप उडवलीय. नंदूरबारमध्ये २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघाची निवडणुक इतिहासात पहिल्यांदा इथली चुरशीची होतेय. डॉ. विजयकुमार गावितांची कन्या डॉ. हीना गावित विरुद्ध काँग्रेसचे जेष्ठ खासदार माणिकराव गावित असा सामना इथे रंगलाय. काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्याविरोधात डॉ. विजयकुमार गावितांनी राजकारणात नवख्या कन्येला निवडणूक रिंगणात उतरवलंय. मात्र, या नवख्या उमेदवारानं काँग्रेसची चांगलीच झोप उडवलीय.
डॉ. हीना गावित यांनी थेट माणिकराव गाविताच्या जेष्ठतेलाच आव्हान दिलंय. नऊ वेळा खासदार निवडणून गेलेल्या माणिकराव यांनी जनतेसाठी काहीही केलेलं नाही. आतातर त्याचं वय झालंय. त्यांना जनतेच्या विकास कामांच ओझ झेपणार नाही. त्यामुळे मतदारांनी माणिकरावांना पुन्हा निवडून टेन्शन देण्यापेक्षा पेन्शन खाऊ द्यावं, असं आवाहन डॉ. हीना मतदारांना करताना दिसतायत. `मतदार संघाच्या विकासासाठी आता आजोबांची नव्हे तर नातीची गरज आहे`, असं सांगून डॉ. हीना या तरुण मतदारांच्या चांगल्याच टाळ्या मिळवताय.
नंदुरबार मतदार संघात दीड लाखापेक्षा जास्त तरुण मतदार वाढलेत. जे या मुद्याला चांगल प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे या आजोबा विरुद्ध नातीच्या प्रराचामुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडलीय. या विषयावर माणिकराव गाविताना प्रश्न विचारला तर ते भलतेच चिडतात. `केवळ तरुण-तरुण करत राजकारण चालत नाही`, असं म्हणतं वेळ मारुन नेण्याची पाळी काँग्रेसवर आलीय.
डॉ. हीनांच्या `आजोबा आता निवृत्त व्हा` या आवाहनावर काँग्रेस कशी मात करते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. मात्र, सध्या आजोबा-नातीच्या लढाईमुळे मतदारांचं चांगलच मनोरंजन होतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.