उत्तर मुंबईत लोकसभेची काँग्रेसला निवडणूक जड

उत्तर मुंबईमधली लढत यंदा लक्षवेधी ठरणार आहे. खरं तर या मतदारसंघात सुरुवातीपासून काँग्रेसचं नामोनिशाणही नव्हतं. पण गोविंदा निवडणुकीला उभा राहिला आणि हे चित्र बदललं. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार आहे. पण आता या निवडणुकीत चित्र बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 11, 2014, 09:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
उत्तर मुंबईमधली लढत यंदा लक्षवेधी ठरणार आहे. खरं तर या मतदारसंघात सुरुवातीपासून काँग्रेसचं नामोनिशाणही नव्हतं. पण गोविंदा निवडणुकीला उभा राहिला आणि हे चित्र बदललं. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार आहे. पण आता या निवडणुकीत चित्र बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेसविरोधी मतदारसंघ समजला जायचा. दहिसर मागठाणे, बोरीवली, चारकोप, कांदिवली आणि मालाड या सहा विधानसभा मतदारसंघ मिळून उत्तर मुंबई मतदार संघ बनलाय. आणीबाणीनंतर मृणाल गोरे आणि त्यानंतर भाजपचे राम नाईक यांनी या मतदारसंघात काँग्रेसचा शिरकाव होऊ दिला नाही. अभिनेता गोविंदाला उमेदवारी मिळाली आणि मग हे चित्र पालटलं.
गेली दहा वर्षं या मतदारसंघावर काँग्रेसच्या पंजाचं वर्चस्व आहे. मात्र यंदाची गणितं लक्षात घेता, गुजरातीबहुल उत्तर मुंबईत यंदा मोदी कार्ड सर्वाधिक चालेल, असा अंदाज आहे. पण त्याचवेळी मतदारांबरोबर सर्वाधिक संपर्क ठेवलेला खासदार म्हणून संजय निरुपम यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळेच उत्तर मुंबईची लढत ही सर्वाधिक तुल्यबळ लढत ठरणार आहे. आपण आतापर्यंत केलेल्या कामांमुळे मतदार आपल्यालाच साथ देतील, असा दावा संजय निरुपमांनी केलाय.
महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनाही विजयाची खात्री आहे. मनसेचा उमेदवार न दिल्यानं त्याचा फायदा होणार असल्याचं त्यांचं म्हणणंय. या मतदार संघात समाजवादी पार्टीकडून कमलेश यादव रिंगणात आहेत. पण सरळसरळ लढत होणार आहे ती काँगेसचे संजय निरुपम आणि भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्यामध्येच.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.