ऑडिट मतदारसंघाचं : नांदेड

ऑडिट मतदारसंघाचं : नांदेड

Updated: Apr 4, 2014, 04:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
सध्या अस्तित्वात असलेल्या नांदेड शहराच्या नावाचा उगम नंदी-तट या शब्दांमधून झाल्याची आख्यायिका आहे. भगवान शंकराचं वाहन असलेल्या नंदीने, पवित्र गोदावरी नदीच्या तटावर अर्थात काठी बसून तपस्या केली होती अशी दंतकथा प्रचलित आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावानेही ओळखला जातो.
शीख धर्मगुरू श्री गुरू गोविंद सिंगजी महाराज यांचं सन 1705 मध्ये याच ठिकाणी देहावसान झालं होतं. रेणुकामातेचं मंदिर आणि गुरू गोविंद सिंगजींच्या समाधीस्थानामुळे नांदेड जिल्ह्याला धार्मिक  आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या जिल्ह्यात ज्वारी आणि कापूस ही प्रमुख पिकं असून, केळीचं देखील पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.
नांदेडमध्ये भरणारी माळेगावची यात्रा देशात प्रसिद्ध असून, उत्तम प्रतीचं पशूधन आणि घोड्यांच्या बाजारासाठीही नांदेड प्रसिद्ध आहे. याच नांदेडमध्ये शेतक-यांसाठी उपयुक्त असं कापूस संशोधन केंद्रही आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ हिंगोली आणि लातूर या दोन लोकसभा मतदारसंघांना लागून आहे. या मतदारसंघात याच जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
 
नांदेड जिल्ह्यात एकुण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सहा नांदेड लोकसभा मतदारसंघात तर उर्वरीत तीन हिंगोली आणि लातूर या दोन लोकसभा मतदारसंघात विभागले गेले आहेत. यापूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेडमधील पाच आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. भौगोलिकदृष्ट्या जसा नांदेड लोकसभा मतदारसंघ बदलला, तसा राजकीयदृष्ट्याही मोठा बदल पाहायला मिळाला.
नांदेड लोकसभा मतदारसंघावर सुरूवातीपासून काँग्रेसचीच सत्ता राहिली. 1989मध्ये जनता दलचे व्यंकटेश काबदे निवडून आले होते. त्यानंतर 1991मध्ये सूर्यकांता पाटील यांच्या रूपाने पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. 1996 मध्ये गंगाधर कुंटुरकर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर 1998 आणि 99मध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर सलग निवडून आले.
तर 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या दिगंबर पाटील यांनी अवघ्या 25 हजार मतांनी विजय मिळवत काँग्रेसच्या वर्चस्वाला शह दिला. 2009मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून तिकीट मिळवलेल्या भास्करराव खतगावकरांनी तिस-यांदा खासदार म्हणून लोकसभा गाठली. 
याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 14 लाख 39 हजार 015 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 38 हजार 996 इतकी होती, तर 7 लाख 19 एवढी महिला मतदारांची संख्या राहिली.
नांदेड लोकसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीपासूनच हेवीवेट मानला जाणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आतापर्यंत तीन निवडणुकींचा अपवाद वगळता, सातत्याने काँग्रेसचेच खासदार निवडून आलेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना सत्ता काबीज करण्यासाठी बराच घाम गाळावा लागेल, कारण काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भास्करराव खतगावकर पाटील यांची ओळख
नाव - खा. भास्करराव पाटील खतगावकर
जन्म - 22 जुलै 1944
वय -  69 वर्ष
शिक्षण -  बी. ई. (मेकँनिकल)
 
नांदेडचे विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे जिल्ह्यातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे खतगावकर नांदेड जिल्ह्याच्या देगलूर-बिलोली तालुक्यातील खतगावचे मूळ रहिवासी. राजकारणातील दांडगा अनुभव गाठीशी असणारे खतगावकर हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांचे मेहुणे.
खतगावकरांनी, राजकीय जीवनाच्या वाटचालीत आतापर्यंत तीन वेळा खासदारकी आणि दोन वेळा आमदारपदही भुषवलं आहे. तसंच राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदही त्यांनी सांभाळलं आहे. सध्या ते काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी आहेत.
1998च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खतगावकर यांना सर्वप्रथम लोकसभेची उमेदवारी दिली होती. सलग दोन लोकसभा विजयानंतर 2004मधील लोकसभा निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकरांना पराभवाची चव चाखायला लागली. मात्र या पराभवानंतर खतगावकरांनी खचून न जाता बिलोली-दिगलूर या पारंपारिक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकली आणि विधानसभेत प्रवेश मिळवला.
 
2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर पाटील पुन्हा विजयी झाले. त्यांना 3 लाख 46 हजार 400 मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार संभ