ऑडिट मतदारसंघाचं : अमरावती

ऑ़डिट मतदारसंघाचं - अमरावती

Updated: Apr 4, 2014, 02:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमरावती
अमरावती शहराचा उल्लेख महाभारत काळातही आढळतो. श्रीकृष्णाने रूक्मिणीचे कौंडिण्यपूर येथून हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात. अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्याची ओळख आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख हे अमरावतीचे सुपुत्र...
1897 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. अमरावती जिल्ह्याला अकोला, यवतमाळ, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठही आहे. 
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीत स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे सातपुड्याच्या कुशीत वसलेलं प्रमुख पर्यटनस्थळ आहे. 
 
सुरूवातीपासून काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सत्ता राहिलेल्या अमरावती मतदारसंघात काँग्रेसचा अखेरचा खासदार निवडून आला तो 1991मध्ये, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने. त्यानंतर 1996 साली शिवसेनेचे अनंतराव गुढे खासदार म्हणून निवडून आले. तर 1998च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रा. सू. गवई खासदार झाले. 1999 आणि 2004मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या अनंतराव गुढे यांनी बाजी मारली. तर 2009 मध्ये हा मतदारसंघ SC साठी राखीव झाल्यानंतरही आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेची सत्ता कायम राखली.
 
2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 14 लाख 23 हजार 855 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 46 हजार 464 होती, तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 77 हजार 391 एवढी होती.
अमरावती अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलली, पण शिवसेनेने आपला गढ कायम राखण्यात यश मिळवलं. तर दुसरीकडे दीड दशकांपासून अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे पंजा उमटलेला नाही. ही बाब काँग्रेसच्या विद्यमान पिढीसाठी अस्वस्थतेचा विषय बनलीय.
अमरावती लोकसभेतील शिवसेनेचे शिलेदार अर्थात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांची ओळख
आनंदराव विठोबा अडसूळ
जन्म - 1 जून 1947
वय -  66 वर्ष
शिक्षण -  वाणिज्य शाखेतून पदवीधर 
 
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ तीनवेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. तर चौथ्यांदा 2009 मध्ये अमरावती मतदारसंघातून निवडून आले. आनंदराव अडसूळ शिवसेनेचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. NDA च्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. बुलढाणा लोकसभेतून ते 1996, 1999 आणि 2004 मध्ये निवडून आले होते. अमरावतीतून खासदार म्हणून त्यांची ही पहिलीच टर्म आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शिवसेना प्रणित ज्या शेकडो कामगार संघटना आहेत त्याचे अध्यक्षपद अडसूळांकडेच आहे.
कामगार चळवळीतून शिवसेनेशी जुळत गेलेल्या अडसूळांचा कामातला प्रामाणिकपणा आणि धडाडी पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडसूळ यांच्यावर सेनेच्या विविध कामगार संघटनांची जबाबदारी सोपवली.
 
मतदारसंघावरही अडसूळांची चांगलीच पकड आहे. 2009 मध्ये अमरावतीतून निवडून आल्यानंतर त्यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आपले पुत्र अभिजीत अडसूळ यांनाही निवडून आणले. आणि अल्पावधीतच जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत केली.
 
2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना 3 लाख 14 हजार 286 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आरपीआय गवई गटाचे उमेदवार राजेंद्र गवई यांच्या पारड्यात 2 लाख 52 हजार 570 मते पडली. अडसूळ यांनी गवईंचा तब्बल 61 हजार 716 मतांनी पराभव केला.
 
खासदार अडसूळ यांची एकूण मालमत्ता ही 1 कोटी 77 लाख 8 हजार 418 रूपयांची असून, यांपैकी 1 कोटी 32 लाख 64 हजार 295 रूपयांची स्था