www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही म्हणत हटून बसलेत. याचवेळेस आज राजीव शुक्ला यांनी मात्र आपल्या आयपीएल कमिशनर पदाचा राजीनामा दिलाय. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.
स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात आल्यानंतर कालच म्हणजे शुक्रवारी बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के आणि बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शिर्के आणि जगदाळे यांच्यानंतर आज शुक्ला यांनीही राजीनामा दिलाय.
गेल्या काही दिवसांमध्ये उजेडात आलेल्या घटनांमुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. ‘मी आयपीएलचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून मी राजीनामा देण्याचा विचार करत होतो. मला वाटतं की राजीनाम्यासाठी हीच वेळ योग्य आहे’ असं त्यांनी म्हटलं.
‘संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी भारतीय क्रिकेटच्या हितासाठी पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्याचं उदाहरणही माझ्यासमोर होतं’ अशी पुष्टीही त्यांनी सोबत जोडली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविवारी बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीआधीच शुक्ला यांनी आपला राजीनामा सादर केलाय. साहजिकच यामुळे बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.