www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडला गँगस्टरपटांचं आकर्षण कायमच राहिलं आहे. राम गोपाल वर्माने अंडरवर्ल्डचं स्वरूप मांडणारे बरेच उत्तम सिनेमे बनवले. महेश मांजरेकरकरच्या वास्तव सिनेमातही एका गँगस्टरचा प्रवास दाखवला होता. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ हा सिनेमाही चांगलाच गाजला. या सिनेमाचा दुसरा भागही येत आहे. संजय गुप्तानेही ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ हा माया डोळसच्या एन्काउंटरवर सिनेमा बनवला होता. आता ८० च्या दशकात मुंबईमध्ये सुरू झालेल्या अंडरवर्ल्डचा वेध घेणारा शूटआऊट अॅट वडाळा हा सिनेमा तो घेऊन आला आहे. १९८२ साली घडलेल्या पोलीस आणि मन्या सुर्वे गँगमधील शूटआऊट वर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमासाठी ‘डोंगरी टू दुबई’ या पुस्तकाचाही आधार घेण्यात आला आहे.
दाऊद इब्राहिमपूर्वी मुंबईच्या अंडरवर्ल्डवर सत्ता गाजवणाऱ्या मन्या सुर्वेची कहाणी या सिनेमात मांडली आहे. कॉलेजमध्ये ७८% मिळवून चांगल्या गुणांनी पास झालेल्या मनोहर सुर्वेला खुनाच्या खोट्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागतं. आणि जेलमध्ये त्याचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. त्यातूनच मुंबईतला डॉन मन्या सुर्वे (जॉन आब्रहम) आकाराला येऊ लागतो. जेलमध्ये त्याची शेख मुनीर (तुषार कपूर) याच्याशी मैत्री होते. तिथून मन्या आपली अंडरवर्ल्डमध्ये ‘हिंदू गँग’ बनवायला सुरूवात करतो. अंडरवर्ल्डमध्ये प्रस्थापित असणाऱ्या दिलनवाझ इम्तियाझ हसकर (सोनू सूद) आणि झुबेर इम्तियाझ हसकर (मनोज वाजपेयी) या ‘भाईं’ना आव्हान देत मन्या सुर्वे मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आपली हुकुमत गाजवू लागतो. गँगवॉर रोखण्याची जबाबदारी असणारा पोलीस अधीक्षक अश्फाक बगरान (अनील कपूर) वडाळा येथे शूटआऊट घडवून आणतो. हा सर्व काळ दाऊद इब्राहिमच्या उदयापूर्वीचा आहे.
हा सिनेमा भन्नाट बनला आहे. ७० आणि ८० च्या दशकातली मुंबई पाहाताना छान वाटते. ८० च्या दशकाचा काळ तंतोतंत उभा केला आहे. प्रमुख कलाकारांनी आपापल्या भूमिकाही छान रंगवल्या आहेत. जॉन आब्रहमने साकारलेला मन्या सुर्वे तर अफलातूनच आहे. जॉन आब्रहमच्या अभिनयाची याआधी फारशी तारीफ झालेली नाही. मात्र या सिनेमात तो मन्या सुर्वे अक्षरशः जगला आहे. त्याचा आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय जॉनने या सिनेमात केला आहे. हसकर बंधूंच्या भूमिकेत सोनू सूद आणि मनोज वाजपेयी यांनीही जान ओतली आहे. तुषार कपूरचा अभिनयही चांगला आहे. अनील कपूर पडद्यावर विलक्षण ऊर्जा घेऊन येतो. सिनेमाच्या एखाद्या सीनमध्ये जॉन आब्रहम आणि अनील कपूर असो वा नसो, त्यांचा प्रभाव जाणवत राहातो. या ,र्वांना उत्तम साथ दिली आहे ती मिलाप झवेरी यांच्या संवाद लेखनाने. सिनेमाभर पिटातल्या प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू येत राहातील, असे संवाद पात्रांच्या तोंडी आहेत. अर्थात बऱ्याचवेळा डायलॉग्जमध्ये आई-बहिणीवरून शिव्या ऐकायला मिळतात. एकूणच सिनेमात गोळ्यांचे आवाज आणि गोळीबंद डायलॉग्ज यांचीच रेलचेल आहे. सोबत प्रियंका चोप्रा, सोफी चौधरी आणि सनी लिऑनचे अनावश्यक आयटम डान्स आहेत. मन्याची प्रेयसी असलेल्या विद्याच्या भूमिकेत कंगना राणावतला फार काही अभिनयाला वाव मिळालेला नाही. बेड सीन्स देण्याव्यतिरीक्त या सिनेमात तिला काही करण्यासारखं नाही. सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा संथ वाटतो. पण उत्तरार्धात सिनेमा चांगला वेग पकडतो. एकुणच हा सिनेमा पाहाताना मजा येते. त्यामुळे अशा पद्धतीचे सिनेमे आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा पैसा वसूल अनुभव देईल, यात शंकाच नाही