www.24taas.com, झी मीडिया, पुणे
एखाद्याला टोपी घालणे, हा वाकप्रचार आपण नक्कीच ऐकला असेल. पण आता `एखाद्याला फेटा बांधणं` हा वाक्प्रचार देखील त्याच अर्थानं वापरता येईल. त्याचं श्रेय पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना द्यावं लागेल. सभागृहाच्या उद्घाटनासाठी भाड्यानं आणलेले फेटे या मान्यवरांनी गहाळ केलेत. आणि त्याचा भुर्दंड म्हणून ७७ हजार रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिलीय.
पुणे महापालिकेच्या नुतनीकरण झालेल्या मुख्य सभागृहाचं उद्घाटन १७ जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला मराठमोळा साज चढवण्यासाठी मान्यवरांच्या डोक्यावर तुर्रेदार फेटे बांधले गेले होते. त्यासाठी विशेष निमंत्रित आणि नगरसेवक यांच्यासाठी वेगळ्या धाटणीचे फेटे भाड्याने मागवण्यात आले होते. मग काय कार्यक्रमात अगदी महिला, पुरुष अशा सगळ्या नगरसेवकांनी मनसोक्त मिरवून घेतलं.
इथपर्यंत सारं ठीक आहे. कार्यक्रमानंतर या मान्यवरांनी स्वत:च्या डोक्यावरील फेटे परत करणं अपेक्षित होतं. मात्र तसं घडलं नाही. ही मान्यवर मंडळी डोक्यावरील फेट्यासह आपपल्या घरी परतली. तेव्हापासून महापालिकेनं भाड्यानं घेतलेले फेटे गायब आहेत.
आता गायब झालेल्या फेट्यांच काय म्हणून कंत्राटदाराने ओरड सुरु केलीय. हा विषय चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण होताच गहाळ झालेल्या फेट्यांच्या भरपाई साठी तब्बल ७७ हजार रुपये स्थायी समिती च्या बैठकीत मंजूर करण्यात आलेत.
फेटे प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव अजिबात नाही. नगरसेवकांच्या हौसेखातर पुणेकरांच्या खिशातून आलेल्या पैशांची ही उधळपट्टी आहे. या फेट्यामुळे कार्यक्रमाची शोभा निश्चितच वाढली. हेच फेटे गायब होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेच्या कारभाराची शोभा झाली अशी चर्चा रंगत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.