मी ‘अक्षर’ बोलतोय...

ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांचं `अक्षर` हे पुण्यातील राहतं घर पुनर्विकासासाठी लवकरच तोडलं जाणार आहे. मात्र, माडगुळकरांच्या स्मृती जपण्यासाठी या वास्तूमध्ये विशेष जागा ठेवण्यात येणार आहे. शिवाय या वास्तूचं नावही बदललं जाणार नाहीय. माडगुळकर आणि `अक्षर` यांचं विशेष नातं सांगणारा हा खास रिपोर्ट...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 24, 2013, 11:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांचं `अक्षर` हे पुण्यातील राहतं घर पुनर्विकासासाठी लवकरच तोडलं जाणार आहे. मात्र, माडगुळकरांच्या स्मृती जपण्यासाठी या वास्तूमध्ये विशेष जागा ठेवण्यात येणार आहे. शिवाय या वास्तूचं नावही बदललं जाणार नाहीय. माडगुळकर आणि `अक्षर` यांचं विशेष नातं सांगणारा हा खास रिपोर्ट...
‘मी अक्षर’... व्यंकटेश माडगूळकरांचं घर... एखाद्या साहित्यिकाच्या घराची ओळख यापेक्षा चांगली काय असू शकते? किंबहुना एखाद्या साहित्यिकाचं अक्षरांवर जितकं प्रेम असतं तितकीच आपुलकी आणि प्रेम एखाद्या वास्तूविषयी वाटावं हे माझं भाग्यच. त्यांनी मला दिलेल्या या नावातूनच त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त होतो...! बासष्ठ साली जेव्हा माझी निर्मिती झाली तेव्हापासून व्यंकटेश माडगुळकर यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकाचा निवारा असण्याचं भाग्य मला लाभलं आणि आजही हीच माझी ओळख कायम आहे.
अत्यंत कमी आर्थिक पाठबळ असताना अनेक संकटांना सामोरं जात माडगुळकरांनी मला जन्माला घातलं. बांधकामात काहीही कमी पडू नये अशी पावलोपावली काळजी त्यांनी घेतली. पानशेतला आलेला पूर आणि इतर आर्थिक विघ्नं पार पडल्यावर १९६२ पासून माडगुळकरांचा सहवास मला अखंडपणे लाभला. माझ्या या निर्मितीला अनेक लेखक, प्रकाशक, संपादक यांचा हातभार तर लागलाच मात्र अनेक साहित्यिकांचा वावर आणि त्यांच्या कलाविष्कारांचाही मी साक्षीदार ठरलोय. माझी ही वास्तू साहित्य-कला-संस्कृतीच्या असंख्य मैफलींनी नेहमीच निनादत राहिली.
एरंडवणा भाग तसा त्यावेळी पुण्यापासून तुटकच... परंतु अत्यंत शांत... आजुवाजुला पुष्कळ झाडी आणि पक्षांची किलबिल... इथल्या याच वैशिष्ट्यांमुळे माडगुळकरांनी माझ्यासाठी या जागेची निवड केली. माडगुळकरांचं निसर्ग प्रेम यातून दिसून येतं... आणि म्हणूनच बांधकाम पूर्ण झाल्यावर अल्पावधीतच नाना तऱ्हेच्या झाडांनी माझं आवार भरून गेलं. वास्तुशिल्प शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी मला आवर्जून भेट देत असत. माडगूळकरांना भेटायला येणाऱ्या अनेक दिग्गजांकडून माझी स्तुती मी अनेकदा ऐकली.. पण मला कृतकृत्य वाटलं ते त्यांनी ‘लेखक घर बांधतो’ या लेखाच्या माध्यमातून माझ्या विषयीच्या भावना शब्दबद्ध केल्या तेव्हा... एका लेखकाच्या मनात माझ्यासारख्या दगडी वास्तूविषयी इतक्या भावना असाव्यात यातूनच त्या लेखकाची प्रतिभा दिसून येते.. हळू हळू वर्षं उलटत गेली तसा माझा समावेश मध्य वस्तीमध्ये होऊ लागला... वाहनं, माणसांची वर्दळ वाढली. परंतु, मध्ये मी एकाएकी पोरका झालो... व्यंकटेश माडगुळकरांचं निधन झालं आणि साहित्यिकांचा वावर, त्यांच्या मैफिली, हास्य विनोद या सगळ्यालाच पूर्णविराम लागला.
सध्या माझ्या आयुष्यातले अखेरचे काही दिवस बाकी आहेत.... काही दिवसात ही दगडी वास्तू पाडून इथे एक टोलेजंग इमारत बांधली जाईल.... दगडी भिंतीची जागा सिमेंटच्या भिंती घेतील.. परसबागेतील रानफुलांची जागा नवीन कुंड्या आणि नकली फुल घेतील...मात्र या सगळ्यामध्ये समाधान एकच.. व्यंकटेश माडगुळकर यांनी मला दिलेल्या ‘अक्षर’ या नावाची ओळख तेवढी जपली जाणारेय... आणि त्यासोबत माझ्या स्मृती देखील...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.