www.24taas.com, पुणे
कानडी हापूसनं कोकणच्या राजाला देशातल्या बाजारपेठेत मोठं आव्हान उभं केलंय. कानडी हापूस पहिल्यांदाच युरोपच्या बाजारपेठेत उतरतोय. ते ही कोकणच्या राजाला मागे टाकून...... विशेष म्हणजे कानडी हापूसचा हा प्रवास होणार आहे कर्नाटक ते युरोप व्हाया पुणे असा......
जानेवारी महिना संपतो न संपतो तोच पुण्याच्या बाजारात फळांचा राजा दाखल झालाय. हा हापूसच आहे... मात्र हा कोकणचा राजा नाही. तर हा आहे कर्नाटक हापूस..... पुण्याच्या मार्केट यार्डात सध्या हा कानडी हापूस विराजमान झालाय. या कानडी हापूसचा प्रवास मात्र इथेच थांबणार नाही. तर, इथून तो जाणार आहे थेट युरोपच्या बाजारपेठेत. त्यासाठीची ही तयारी. आंब्याला युरोपला पाठवण्यासाठीचं विशेष पॅकेजिंग केलं जातंय. आंबा पिकवण्याची शास्त्रीय पद्धत आणि युरोपीय बाजारपेठेत आंबा नेण्यासाठी आवश्यक असलेलं फायटो सेनिटरी प्रमाणपत्रही सोबत आहे.
कानडी हापूस पहिल्यांदाच परदेशात जातोय. तेही थेट युरोपमध्ये.... कोकण हापूसही युरोपात जातो. मात्र मुख्यतः लंडन मध्ये..... कानडी हापूस मात्र युरोपच्या इतर देशांमध्ये जाणार आहे. आपल्या चवीनं तिथल्या लोकांना भुरळ घालणार आहे. कोकण हापूसला परदेशातल्या बाजारपेठेत अशी स्पर्धा निर्माण करायला हा कानडी हापूस निघालाय. मात्र त्याआधी त्यानं देशी बाजारपेठेतही कोकणच्या राजाला घाम फोडलाय.
अगदी काही वर्षापर्यंत कर्नाटक हापूस हलक्या दर्जाचा समाजाला जायचा. आता मात्र परिस्थिती बदलत असल्याचं चित्र आहे. कर्नाटक हापूसची ही प्रगती मात्र एका दिवसातली किंवा अचानक झालेली नाही. तर त्यामागे तिथल्या शेतक-यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्ट आहेत. कानडी हापूसची मुबलकता, कमी दर आणि चवही चांगली. त्यामुळे सामान्य ग्राहकाकडून या आंब्याला मागणी वाढतेय. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही हळूहळू या कानडी हापूसकडे वाळू लागलेत.
कानडी हापूसचा खप कितीही वाढला, तरी त्याला कोकणातल्या हापूसची जागा मात्र घेता येणार नाही. कारण कोकण हापूसची चव. चवीच्या बाबतीत कानडी हापूस नेहमीच मागे राहणार. चवीच्या बाबतीत अस्सल खावयांची कोकण हापूसलाच मागणी असणार. तरीही कर्नाटक हापूसचं आव्हान पेलायचं असेल तर कोकणातल्या आंबा बागायतदारांना यापुढच्या काळात मात्र विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत...