www.24taas.com, मुंबई
डोंबिवलीत घडलेल्या एका प्रकारानं आता बालगुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. मुंबईसारख्या शहरात याची मागील दोन वर्षात दाहकता वाढलीय.. राज्यभरातलं प्रमाणही प्रचंड वाढलय... आपल्याबरोबरचा समवयस्क असलेला कुणीही कदाचित जिवलग मित्र हा कुठल्यातरी विकृतीचा नाहक बळी पडतो.. आणि या सगळ्या दुर्दैवी घटनांची नोंद डोळ्यात अंजन घालणारी आहे..
डोंबिवलीत संतोष विचिवारा या सतरा वर्षीय अल्पवीयन मुलाचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या पाच आरोपींपैकी चौघेजण अल्पवयीन आहेत. या घटनेमुळं बालगुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबईसारख्या शहरात तर याची दाहकता अधिक जाणवते. मुंबईत दोन वर्षांत बालगुन्हेगारीच्या प्रमाणात १३ टक्क्यानं वाढ झालीय. अल्पवयीन मुलांनी 2009 मध्ये 24 आणि 2011 मध्ये 24 खून केलेत. खुनाचे प्रयत्न 11 वरुन 24, बलात्कार 21 वरुन 23, अपहरण 2 वरुन 4, घरफोडी 115 वरुन 106. दुखापत करणे 166 वरुन 240, चोरी 323 वरुन 275, लूट 11 वरुन 33, विनयभंग 19 वरुन 28, लैंगिंक शोषण 2 वरुन 8, दंगलीतमध्ये 17 वरुन 39 अशा प्रमाणात बालगुन्ह्यांचा वाढता आलेख दिसून येतो.
खेळण्या-बागडण्याच्या आणि स्वप्नांना आकार देण्याच्या वयात मुलांच्या हातात पडलेल्या बेड्या पाहून काय वाटत असेल त्यांच्या आई-वडिलांना ? कुठल्याच आई-वडिलांना आपली मुलं गुन्हेगार व्हावीत असं वाटतं नाही. मग चुकतं तरी कुठं आणि कुणाचं ? मुलांवरील संस्कारात आई-वडिल कमी पडतायत का ? करियर आणि नोकरीमुळे पालक मुलांना कमी वेळ देतात का ? टीव्ही आणि सोशल मिडियाचा बालपणावर काय होतो परिणाम ? मुलांचे खेळ आणि आवडीनिवडी बदलल्याचा तर हा परिणाम नाही ? यासारख्या प्रश्नांचा सखोलतेनं विचार करण्याची गरज आता निर्माण झालीय. बदलत्या लाईफस्टाईलचा परिणामही बालपणावर होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळं गुन्हेगारीच्या या जाळ्यात मुलांना जाण्यापासून वाचविण्याची जबाबदारी पालकांसोबतच समाजाचीही आहे