www.24taas.com, औरंगाबाद
दुष्काळात अनेक शेतक-यांचं नुकसान झालं असलं तरी काही शेतक-यांनी मात्र अत्यल्प पाण्यात चांगलं उत्पादन घेतलंय अशा शेतक-यांपैकी औरंगाबदच्या ज्ञानेश्व काकडे य़ांनी फुलकोबीचं उत्पादन घेऊन शेतक-यांपुढे आपला आदर्श ठवेलाय.
औरंगाबाद शहरापासून अवघ्या 15 किलोमिटर अंतरावरील वडखा गावात ज्ञानेश्वर काकडे या प्रगतीशील शेतक-याचं फुलकोबीचं शेत आहे. अवघ्या सव्वीशीतल्या या यवकानं उपलब्ध असणा-या पाण्याच्या भरवश्यावर एक एकर क्षेत्रातून कमालीचं उत्पादन घेतलंय.फुलकोबीपासून वर्षाकाठी दीड लाखांपर्यंतच उत्पन्न घेणा-या या शेतक-यानं यंदाच्या दुष्काळातही फुलकोबीचं आत्तापर्यंत 80 हजारांचं उत्पन्न घेतलं असून अजूनही फुलकोबीचं तोडणी शिल्लक आहे.
एक एकराच्या लागवडीसाठी ज्ञानेश्वर काकडे यांनी फुलकोबीच्या रोपांची लागवड एक फुटावर केली..रोजचं 1 तास चालणा-या मोटरपंपावर त्यांनी अर्धा क्षेत्र ठिबकवर तर अर्ध क्षेत्र पाटपाण्याने सिंचीत केली.पाटपाण्याने त्यांनी 8 दांड रोज भरले अशा पद्दतीने 40 दांडासाठी त्यांनी 5 दिवस घेतलेत.लागवडीच्या वेळेस एका एकराला 6 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट दिल्याने त्याने जोमदार उत्पादन घेण्यासाठी मदत झाली.
ज्ञानेश्वर यांचं कुटूंबाने शेतात पूर्णवेळ दिल्याने शेतात तण राहिला नाही. वेळच्या वेळी केलेल्या निरिक्षणामुळे किड आणि रोगाचा प्रादुर्भाव हि कमी झाला. काकडे यांना फुलकोबीचा प्रत्येक गड्डा जवळपास पाऊण ते दिड किलो वजनपर्यंत मिळाला.
काकडे यांना यंदाच्या हंगामात रोप,रासायनिक खतं, किटकनाशक,मजूरी,हमाली असा बाजारपेठेपर्यंतचा खर्च एकूण 41 हजार रुपये खर्च आला. काकडे यांनी औरंगाबाद आणि नागपूरच्या बाजारपेठेत 500 कट्टे फुलकोबी विकली. त्यांना एका कट्ट्याला 250 रुपये अशा प्रकारे दर मिळाला. यातून त्यांना 1 लाख 25 हजार रुपये एकूण उत्पादन मिळालं.खर्च वजा जाता त्यांना 84 हजार रुपयांचा निव्वळ नफा केवळ तीनच महिन्यात झालाय.
पाऊस जर नियमित असता तर नफ्यात आणखी वाढ झाली असती अशी भावना ज्ञानेश्वर काकडेंनी व्यक्त केली. बियाण्याची निवड, खतांची मात्रा, पाण्याचं नियोजन, निंदंण आणि किड रोगाचं परिक्षण चोख बजावल्याने ज्ञानेश्वर काकडे यांना दर्जेदार उत्पादन मिळालं तसेच त्यांनी दुरच्या बाजारपेठेत विक्री व्यवस्थापन केल्यानं त्यांना दुष्काळातही चांगलं उत्पादन घेता आलंय.