शिवसेनाप्रमुख आणि शिवबंधनाचा धागा!

शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आज प्रतिज्ञा दिन साजरा करत आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2014, 05:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आज प्रतिज्ञा दिन साजरा करत आहे. राज्यभरातल्या सर्व शिवसैनिकांना शिवबंधनाचा धागा बांधण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि देश घडवण्यातची शपथ शिवसैनिकांना देण्यात येणार आहे. 
मुंबईतल्या सोमय्या महाविद्यालयाच्या  मैदानावर  या  कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मुंबईसह राज्यभरातले शिवसैनिक या प्रतिज्ञा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमत आहेत. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेतली मरगळ अनेक उफाळलेल्या बंडाळ्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हा खटाटोप केल्याचं बोललं जातंय.  

गंडेदोरे बांधून शिवसेनेला जनाधार मिळणार?
माहौल कुठलाही असो, गर्दी आणि बाळासाहेब हे समीकरण जसं पक्कं होतं, अगदी तसं बाळासाहेब आणि शिवसैनिक हे समीकरणही अतूट राहिलंय. मात्र, आता बाळासाहेबांचं निधन झालंय. काळ बदललाय. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेची सारी सूत्रं पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंकडे आलीत. पण शिवसेनेसाठी मायनस पॉईंट म्हणजे उद्धव ठाकरे अजूनही पक्षाचा चेहरा बनू शकलेले नाहीत. आज, शिवसेनाप्रमुखांची जयंती आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दिवस `प्रतिज्ञा दिन` म्हणून शिवसेना साजरा करणार आहे. यादिवशी तमाम शिवसैनिक `शिवबंधन` धागा बांधून शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि देश घडवण्याची शपथ घेणार आहेत. त्यानिमित्तानं मुंबईभर पोस्टर्स लावण्यात आली असून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आलीय.
सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी गावागावातून लोखंड गोळा करण्याच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी मतांची बेगमी चालवलीय. तर राहुल गांधी सरकारी वटहुकूमांची फाडाफाड करून काँग्रेसची व्होट बँक टिकवण्याचा प्रयत्न करतायत. शिवाजी महाराजांच्या कागदावरील स्मारकाची उंची वाढवून, राष्ट्रवादीवाले मतांचं गाठोडं बांधण्याच्या तयारीत आहेत. याउलट शिवसेनेची भिस्त मात्र त्यांच्या जुन्या आणि ओरिजनल ब्रँण्डवरच आहे... आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे... शिवसेनेच्या `प्रतिज्ञा दिनी` या ब्रँण्डचं रिलान्चिंग होतंय, हे विशेष.... बाळासाहेब ठाकरेंची देवळं बांधून, शिवसेनानिष्ठ भाविक घडवण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. आता शिवबंधन नावाचे गंडेदोरे बांधून निवडणुकांच्या तोंडावर ब्रँड बाळासाहेब पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.
उद्धव ठाकरेंचं नेतृत्व ब्रँड म्हणून प्रस्थापित होत नसल्यानंच शिवसेनेला पुन्हा एकदा बाळासाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय. परंतु शिवसैनिकांच्या हातात गंडेदोरे बांधून आणि देवळं बांधून शिवसेनेला आपला कमी होत चाललेला जनाधार पुन्हा मिळवता येऊ शकतो का? हा मोठा प्रश्नच आहे.
 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.