हॉरर आणि थ्रीलच्या रंगात रंगलेला `आत्मा`

दिग्दर्शक आणि लेखक सुपर्ण वर्मा यांनी आपल्या या नव्या फिल्मचा ‘आत्मा’ मोठ्या खुबीनं प्रेक्षकांसमोर सादर केलाय. हा सिनेमा वेगवेगळ्या पैलूंमध्ये चांगलाच जमलाय, असं म्हणायला हरकत नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 23, 2013, 08:43 AM IST

सिनेमा : आत्मा
दिग्गर्शक – लेखक : सुपर्ण वर्मा
कलाकार : बिपाशा बासू, नवाजुद्दीन सिद्दीकी, डॉयल धवन

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडमध्ये हॉरर फिल्मसचा आलेख म्हणावा तसा उंचावलेला दिसत नाही. आत्तापर्यंतच्या काही मोजक्याच हॉरर फिल्मस प्रेक्षकांच्या मनात खरोखरच भीती उत्पन्न करण्यात यशस्वी झाल्यात. (तसं इतर काही फिल्मसनंही प्रेक्षकांच्या मनात भीती उत्पन्न केलीय, की ज्यामुळे लोकांनी फंटूस हॉरर फिल्मस बघणंच सोडून दिलंय). हॉरर फिल्मसमध्ये रामगोपाल वर्माचा ‘हातखंडा’ आहे हे आपल्याला माहितीच आहे. आता सुपर्ण वर्मा यांनी आपला ‘आत्मा’ मोठ्या पडद्यावर आणलाय.
यावेळेस दिग्दर्शक आणि लेखक सुपर्ण वर्मा यांनी आपल्या या नव्या फिल्मचा ‘आत्मा’ मोठ्या खुबीनं प्रेक्षकांसमोर सादर केलाय. हा सिनेमा वेगवेगळ्या पैलूंमध्ये चांगलाच जमलाय, असं म्हणायला हरकत नाही. कारण शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा उद्देश या दीड तासांच्या सिनेमानं साध्य केलाय. भीतीदायक वातावरणनिर्मिती हा हॉरर फिल्मसचा गाभा दिग्दर्शकांना चांगल्या प्रकारे पेललाय.

सिनेमाचं कथानक
या सिनेमाची कथा बेतलेय ती ‘सिंगल पॅरेन्ट’ म्हणून आपल्या चिमुकलीला जपणाऱ्या आईची आणि तिच्या चिमुकलीची... सिनेमाची कथा सुरू होते बिपाशा बासू (माया) हिच्यापासून... ती आपल्या मुलीला एकटीच सांभाळतेय आणि अशातच तिची मुलगी ‘निया’ आपल्या मृत वडिल अभयशी (नवाजुद्दीन सिद्दीकी) नेहमी गप्पा मारताना तिला भनक लागते. त्यानंतर सुरु होतो अजब-गजब घटनांचा सिलसिला.... याच संबंधी नियाच्या शाळेच्या शिक्षकांच्याही काही तक्रारी बिपाशापर्यंत पोहचतात. एखाद्या मनोविकार तज्ज्ञाच्या मदतीची गरज असल्याचा सल्ला तिला मिळतो.
पण, याच दरम्यान तिचा मृत पती अभय छोट्या ‘निया’ला मिळवण्यासाठी आल्याचं बिपाशाला उमगतं आणि त्यानंतर सुरू होते एका आईची लढाई... आपल्या चिमुकलीला एका ‘आत्म्याच्या’ सावलीतून बाहेर काढण्यासाठी...

काय पाहाल आणि काय नाही...
एका प्रेमळ आणि कणखर आईच्या भूमिका बिपाशानं चांगलीच रेखाटलीय. तिचा सिनेमातील अभिनय उत्कृष्ठ आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचंही काम कौतुकास्पद आहे. तर एका आत्म्याच्या तावडीत सापडलेल्या चिमुकलीच्या भूमिकेत डॉयल धवनही भीतीदायक वाटते.
सिनेमात प्रेक्षकांना खटकणाऱ्या थोड्या फार गोष्टी आहेत. जसं, काही भूमिका विनाकारण घुसडल्यात असं वाटत राहतं. तसंच सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना भीतीची अनुभूती जेवढ्या तीव्रतेने मिळते तेवढीच तीव्रता निर्माण करण्यात सिनेमा मात्र थोडा कमी पडतो. सिनेमातील गाणी थिएटरच्या बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षकांना आठवणार नाहीत. कारण, ही उणिव सिनेमात राहिलीय. पण, हॉरर सिनेमाचा गाभा असलेली भीतीदायक वातावरणनिर्मिती करण्यात मात्र सिनेमा यशस्वी झालाय.
एकूणच काय तर...
हॉरर सिनेरसिक हा सिनेमा चांगलाच एन्जॉय करू शकतील. एकदा या सिनेमाचा अनुभव घेतलात तरी चालेल. दीड तासांत भीतीदायक अनुभवन घ्यायचा असेल तर सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहणं काही वाईट नाही.