मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे कृपाशंकर

कुबेरालाही लाजवेल अशा कृपाशंकरांच्या बेहिशोबी संपत्तीची मोजदाद अजूनही सुरु असतानाच त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 105 एकर जमीन त्यांनी खोट्या कागदपत्राद्वारे लाटल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मयत असलेल्या जमीन मालकाला जीवंत दाखवून ही जमीन कवडीमोल भावानं लाटली.

Updated: Mar 11, 2012, 09:56 AM IST

www.24taas.com,संदेश सावंत- रत्नागिरी

 

कुबेरालाही लाजवेल अशा कृपाशंकरांच्या बेहिशोबी संपत्तीची मोजदाद अजूनही सुरु असतानाच त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 105 एकर जमीन त्यांनी खोट्या कागदपत्राद्वारे लाटल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मयत असलेल्या जमीन मालकाला जीवंत दाखवून ही जमीन कवडीमोल भावानं लाटली.

 

राजापूर तालुक्यातल्या वाडापेठ आडीवरे इथल्या कृपाशंकर सिंह यांच्या मालकीच्या या 105 एकर जमिनीवर तीन हजार आंब्याची कलमे उभी आहेत. ही जमीन लाटण्यासाठी कृपाशंकरांनी मेलेल्याही जीवंत करायला मागेपुढं पाहिलं नाही. कृपाशंकर, दलाल आणि सरकारी बाबूंच्या भ्रष्ट युतीचा अजब नमुना इथं पहायला मिळतो.

 

जमिनीचे मालक रामचंद्र मोरे हे 1950 मध्ये मयत झालेले असतानाही जमिनीचे खरेदीखत करताना त्यांना जीवंत करण्यात आले. मोरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुक्मिणी या एकमेव वारसदार आहेत. गरीबीचे आणि हलाखीचे जीवन जगावं लागणा-या रुक्मिणी यांना आपली जमीन परस्पर विकली गेल्याचं समजताच त्यांची बोलतीच बंद झाली.

 

 

 

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी ही जमीन आपली पत्नी मालतासिंह हिच्या नावे खरदे केलीय. सध्या तीस कोटींची किंमत असलेली ही जमीन कृपाशंकर सिंहांनी सुधीर शेखे या एजंटाच्या मदतीनं 12 एप्रिल 2004 रोजी अवघ्या 5 लाख 80 हजारांत खरेदी केलीय. विशेष म्हणजे जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा दाखलाही सादर करण्यात आलेला नाही. ग्रामस्थांनी याप्रकरणी शासनाचे दरवाजे ठोठावूनही काही उपयोग झाला नाही.

 

 

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत सरकारी बाबू  यावर बोलण्याचं टाळत आहेत. कृपाशंकर आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेतच. परंतु त्यांना अवैध प्रकारे जमीन मिळवून देणा-या सरकारी बाबू आणि दलालांवरही कारवाई होण्याची गरज आहे.

 

[jwplayer mediaid="63343"]