झी 24 तास वेब टीम, पंकज दळवी, मुंबई
आजही मुली या नकोशी म्हणूनच आहेत. मुलीचीं संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, आणि त्यामुळे एकतर मुलीचीं गर्भलिंग चाचणी करून गर्भामध्येच संपविण्यात येतं. नाहीतर जन्माला आल्यावर तिची जागा असते उकरिड्यावर. अशीच काहीशी घटना घडली आहे मुंबईतील बोरिवलीमध्ये. दस-याचा दिवशी बोरिवलीतल्या मागठाणे भागातल्या एका कचरापेटीत एका पिशवीत हालचाल होताना काही महिलांनी पाहिलं. कुतूहल म्हणून त्या सतर्क महिलांनी पिशवी उघडून पाहिली. त्यात नुकतीच जन्माला आलेल्या एका मुलीला जन्मदात्या आईनं उकीरड्यावर फेकून दिली होती. आईपासून वेगळं करताना कापलेली नाळही तिच्या शरीरावर तशीच होती.
जन्मताच आईनं रस्त्यावर फेकून दिलेल्या बालकाला मायेची उब मिळणं तसं विरळच असतं पण मुंबईत बोरिवलीतल्या चिमुरडीच्या वाट्याला तसं सुख आलं आहे. दस-याला रस्त्यावर सापडलेल्या दुर्गाची ही दुर्दैवी कहाणी.त्या अर्भकाची अवस्था पाहून हादरलेल्या या महिलांनी मग वेळ न दवडता पोलिसांना माहिती दिली आणि नवजात बालिकेला महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. प्राथमिक उपचारानंतर या बालिकेला मग जुहूच्या कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानं आता तिची रवानगी दिंडोशीच्या बालक आश्रमात होणारा आहे.
मुलगी म्हणून जन्माला आल्यानं कदाचित दुर्गाच्या नशिबात जन्मताच अवहेलना आली. मुलीचा जन्म घेतल्यानं जन्मापासून असा संघर्ष करावा लागत आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मुंबईसारख्या प्रगत शहरात आजही अशा घटना घडत आहे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.