www.24taas.com, पिंपरी चिंचवड
पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं असतानाच पिंपरी-चिंचवडच्या सागरमाथा संस्थेच्या चार मावळ्यांनीही आज सकाळी एव्हरेस्टला गवसणी घातली. पण ‘सागरमाथा’च्या यशाला दुख:ची एक झालर होती. ज्या रमेश गुळवेंनी ही मोहीम आखली होती त्यांचाच या मोहिमेदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं 'गड आला पण सिंह गेला' असा अनुभव पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहकांना आला.
भोसरीमधल्या सागरमाथा संस्थेचे अध्यक्ष रमेश गुळवेंनी स्वप्न पाहिलं कमीत कमी खर्चात एव्हरेस्ट सर करण्याचं... एकीकडं पुण्यातली ‘गिरीप्रेमी संस्था’ ही मोहीम आखत असताना रमेशनेही पिंपरीतल्या तरुणांना घेऊन एव्हरेस्टची मोहीम आखली. ही मोहीम सुरु असतानाच रमेशचा आजारपणात मृत्यू झाला. पण न खचता सागरमाथा संस्थेच्या मावळ्यांनी रमेशचं स्वप्न जिवंत ठेवलं. श्रीहरी तापकीर, आनंद बनसोडे, सागर पालकर आणि बालाजी माने यांनी रविवारी सकाळी पावणे सात वाजता मिशन एव्हरेस्ट फत्ते केलं. पिंपरीत एकाच जल्लोष झाला. पण ज्या रमेशन हे स्वप्न पाहिलं तो हयात नसल्यान या आनंदाला दुख:ची झालर होती.
पहिल्या प्रयत्नांतच यश मिळवून या चौघा गिर्यारोहकांनी शहरातील पहिले एव्हरेस्ट वीर होण्याचा मान मिळविला. आकुर्डी येथील बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयात सर्वांनी एकत्र येऊन रमेशला श्रद्धांजली वाहिली.
व्हिडिओ पाहा :
[jwplayer mediaid="105240"]