www.24taas.com, मुंबई
मुंबई विद्यापीठाचा टी.वाय. बी. कॉमचा (T.Y. B.COM ) एमएचआरएमचा पेपर फुटल्या प्रकरणी आता या विषयाची ११ एप्रिलला पुन्हा परीक्षा होणार आहे. परीक्षा मंडळानं याबाबत निर्णय घेतलाय. त्यामुळं ८५ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीक़ॉमच्या परीक्षेत गेल्या काही दिवसात प्रचंड घोळ सुरु आहेत. मंगळवारी झालेल्या अर्थशास्त्राच्या पेपरला जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा देणाऱ्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. तसंच आता एमएचआरएमचा पेपर फुटल्याने जवळजवळ ८५ हजार विद्यार्थ्यांना पेपर द्यावा लागणार आहे.
बी. कॉमच्या एका विषयाचा पेपर फुटल्याचा आरोपही विद्यार्थ्यांकडून केला जात होता. मात्र विद्यापीठ या गोष्टीला नकार देत होता. मात्र आता या पेपरफुटीबावर शिक्कामोर्तब झालं आहे. या प्रकरणानंतर विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर आणि शिवसेनेतला संघर्ष टोकाला पोहचला होता. पेपर फुटल्याप्रकरणी विधानपरिषदेत आणि विद्यापीठाच्या सिनेट बजेटमध्ये शिवसेनेनं गदारोळ केला होता.