www.24taas.com, मुंबई
दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यातच महाविद्यालयांची दारे खुली होणार आहेत.
ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा कालावधी कमी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने बायफोकल शाखेचे प्रवेश ऑफलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सायंस, कॉमर्स आणि आर्ट्स या शाखांसाठीच ऑनलाइन पद्धतीने प्रवेश होणार आहे.
अल्पसंख्याक, इनहाऊस आणि मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश १३ ते २३ जून या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होतील. विद्यार्थी दहावीच्या ऑनलाइन मार्कशीटद्वारे हे प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्कशीटवर मुख्याध्यापकांची सही, शाळेचा शिक्का तसंच शाळा सोडल्याचा मूळ दाखलाही अर्जाला जोडून घ्यावा.
ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण होणार असल्याने ऑगस्ट महिन्यात चाचणी परीक्षा होणार आहे. तर एटीकेटीचे प्रवेश ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील वेबसाईटवर तसेच महाविद्यालयांच्या सूचना फलकावर जाहीर करण्यात येतील. एटीकेटी व सीबीएसई व आयजीसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर महाविद्यालय स्तरावर होतील.
ऑनलाइन अर्ज कसा भरावा?
- ऑनलाइन अर्जाचा भाग १ (नोंदणी अर्ज) व भाग २ (पसंतीक्रम) काळजीपूर्वक भरून संगणकावरील सबमीट बटण क्लिक करावे. त्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट घ्यावी.
- आरक्षित संवर्गातून अर्ज करणार्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रमाणपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून अर्जाचा भाग १ मान्य करून घ्यावा. त्यानंतर त्यांना अर्जाचा भाग २ भरता येईल.
- ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ऑनलाइन प्रवेश मिळेल त्यांनी संबंधित महाविद्यालयात ५० रुपये शुल्क भरून तात्पुरता प्रवेश घ्यावा अन्यथा विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जाईल.
- बेटरमेंटमुळे विद्यार्थ्याला दुसर्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला असेल तर त्याने ५० रुपये भरून घेतलेला तात्पुरता प्रवेश रद्द करावा.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन प्रवेश अर्ज १४ ते २१ जून
सादर करणे.
प्रवेशअर्ज तपासून २२ जून
दुरुस्त करणे (दुपारी २ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी २७ जून (सायं. ५ वा.)
पहिल्या यादीनुसार २८ ते ३० जून
प्रवेश (सकाळी १० ते दुपारी ४)
दुसरी गुणवत्ता यादी ४ जुलै (सायं. ५ वा.)
दुसर्या यादीनुसार ५, ६ जुलै (सकाळी १० ते दुपारी ४)
७ जुलै (सकाळी १० ते दु. १)
शेवटची गुणवत्ता यादी १० जुलै (सायं. ५ वा.)
शेवटच्या यादीनुसार ११, १२ जुलै
प्रवेश (सकाळी १० ते दुपारी ४)