www.24taas.com, मुंबई
आपल्यापासून दूर राहणाऱ्या नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी ई-मेल किंवा एसएमएस हा हल्लीचा पर्याय... मात्र, आपल्या मनातल्या शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचं आणखी एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे भेटकार्ड अर्थातच ग्रीटींग कार्डस्. खास दिवाळीसाठी सध्या बाजारात मराठी ग्रीटींग्सही उपलब्ध आहेत.
धकाधकीच्या जीवनात दिवाळीच्या शुभेच्छा आणि भेट प्रत्यक्षात भेटून देता येतीलच असं नाही, कित्येकदा मनात असूनही दूरवर राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेट देता येत नाही आणि अशावेळी आपल्या मदतीला धावतात ते ग्रीटींग कार्डस्... खरं तर सध्या जमाना आहे एसएमएस आणि ईमेलचा पण या तांत्रिक शुभेच्छा मात्र कुठेतरी कोरड्या वाटतात, म्हणूनच आपल्या मनातल्या खऱ्या भावना सुंदर चित्रांबरोबर पोहचवण्याचं काम करतात ग्रीटींग कार्ड... मग, दिवाळीतील खास अशा भाऊबीज किंवा पाडव्यासारख्या दिवसांसाठी तर चारोळी, कविता, संदेश यांचा वापर केलेल्या ग्रीटींग्सना तर जास्त पसंती असते.
दिवाळी निमित्तानं विविध भाषांमध्ये ग्रीटींग्ज भेटवस्तूंच्या दुकांनामध्ये सध्या उपलब्ध आहेत. मात्र, मराठी भाषेच्या सामर्थ्यामुळे त्यातील मजकुरामुळे ग्राहकांची मागणी मराठी ग्रीटींग्जनाचं अधिक असते. शेवटी-शेवटी तर मराठी ग्रिटींग्ज मिळतही नाहीत, असं विक्रेते सांगतात. ग्राहकांची मराठी ग्रिटींग्ज खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी पाहता ई-मेल आणि मोबाईलच्या जमान्यातही मराठी भाषेचं सामर्थ्य लक्षात येतं.