श्रीनिवासनच होणार बीसीसीआयचे ‘सुप्रीमो’!

एन. श्रीनिवासन हेच बीसीसीआयचे पुन्हा सुप्रीमो होणार असून आता त्यावर केवळ शिक्कामोर्तब होण बाकी आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 28, 2013, 10:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एन. श्रीनिवासन हेच बीसीसीआयचे पुन्हा सुप्रीमो होणार असून आता त्यावर केवळ शिक्कामोर्तब होण बाकी आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूकीच्या रिंगणात श्रीनिवासन हेच एकमेव उमेदवार असल्याने त्यांचीच बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान, कार्यकारणीमध्ये इतर काही बदल करण्यात येणार आहेत. आता बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत काय घडत याकडेच क्रिकेटविश्वातील साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
आडमुठे आणि हेकेखोर एन. श्रीनिवासन हेच पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे आता जवळपास निश्चित झालंय. अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन यांनीच केवळ नॉमिनेशन फॉर्म भरला असल्याने तेच पुन्हा बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट आहे. दक्षिण विभागातील सहाही मते आपल्याकडे वळवण्यात श्रीनिवासन यांना यश आले आहे. यामुळे त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, हे नक्की... चेन्नईत बीसीसीआयच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अजूनही बरेच महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.
बोर्डाचे उपाध्यक्ष अरुण जेटली, निरंजन शहा आणि सुधीर डबीर हे तिघेही आपली पद सोडणार असून राजीव शुक्ला, रवी सावंत आणि स्नेह बंसल या तिघांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल. हंगामी सेक्रेटरी आणि श्रीनिवासन यांचे समर्थक संजय पटेल यांच्याकडे कायमच सेक्रेटरी पद सोपवण्यात येणार आहे. याशिवाय अनुराग ठाकूर हे जॉईंट सेक्रेटरी पदावर कायम राहणार आहेत. खजिनदारपदी असलेल्या रवी सावंत यांच्या जागी अनिरुद्ध चौधरी यांची नियुक्ती करण्यात येईल. मात्र, आयपीएलच्या कमिश्नरपदी कोणाची वर्णी लागते याकेडच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल. दरम्यान, सिनिअर सिलेक्शन कमिटीमध्ये काहीही बदल होणार नाहीत. मात्र ज्युनिअर सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत पंडित यांना रोटेशन पॉलिसीमुळे आपल पद गमवावं लागणार असून त्यांच्या जागी केरळाच्या के. जयरामन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

याशिवाय या बैठकीत दक्षिण आफ्रिका दौरा आणि राज्यांच्या टॅक्स पॉलिसीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. आता श्रीनिवासन यांची रणनीति प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात तंतोतंत यशस्वी ठरली तर पुन्हा एकदा श्रीनिवासन हेच बीसीसीआयचे सुप्रीमो असणार हे निश्चित.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.