www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएलच्या सहाव्या सिझनमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेल्या क्रिकेटपटू अजित चंडीलासह दोघांना आज दिल्ली कोर्टानं जामीन मंजूर केला. शिवाय खटल्यातला काही भाग गहाळ असल्याचं कोर्टानं सांगितलं.
अतिरिक्त सत्र न्यायालयाचे धर्मेश शर्मा यांनी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजिक चंडीला, माजी रणजीपटू बाबूराव यादव आणि सट्टेबाज दीपक कुमार या तिघांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. चंडीलाला १६ मे ला अटक करण्यात आली होती. इतर जितेंद्र कुमार जैन, रमेश व्यास, अश्विनी अग्रवाल, सुनिल भाटिया आणि फिरोज अहमद या पाच जणांनी जामीनासाठी केलेला अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणाशी चौकशी अद्याप पूर्ण न झाल्यानं यांचा जामीन नाकारण्यात आलाय.
तीन आरोपींना जामीन देत कोर्टानं दिल्ली पोलीस आयुक्तांना एक महिन्याच्या आत गहाळ गोष्टींचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्ली कोर्टानं यापूर्वी या प्रकरणात अडकलेले राजस्थान रॉयल्सचे खेळाडू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांना जामीन दिला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून या सर्व खेळाडूंसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.