www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम
पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची उत्सुकता आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नेहमीच असते. एजबस्टन येथे रंगणाऱ्या भारत-पाक मॅचची तिकिटं जवळपास पाच महिने आधीच संपली असून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत पाकिस्तानला नमवण्याची किमया साधणार का याचीच फॅन्सना उत्सुकता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत धोनी ब्रिगेड अखेरच्या लीग मॅचमध्ये पाकिस्तानविरूद्ध भिडण्यास सज्ज झाली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी अशी ओळख असणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान मॅचकडे अख्ख्या क्रिकेट विश्वाच्या नजरा लागलेल्या असणार. भारताने सुरूवातीच्या दोन्ही लीग मॅचेस जिंकत याआधीच चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी-फायनल गाठली आहे. तर दुसरीकडे सलग दोन पराभवांसह पाकिस्तानचं टूर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र, दोन्ही टीम्सच्या चाहत्यांना या लढतीत पराभव मान्य असणार नाही. आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीत सातत्याने पाकिस्तानविरूद्ध पराभूत झालेली भारतीय टीम विजय मिळवत इतिहास बदलण्याच्या तयारीत असेल. टूर्नामेंटमध्ये मजबूत बॅटिंग लाईनअप ही आतापर्यंत भारताकरता जमेची बाजू ठरली आहे. पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये सलग सेंच्युरी झळकावणारा शिखर धवन आणि सलग हाफ सेंच्युरी झळकावणारा रोहित शर्मा यांच्याकडून पाकिस्तानविरूद्धही तशाच शानदार कामगिरीची अपेक्षा भारताला असेल वन-डाऊन येणाऱ्या विराटला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं असलं तरी एजबस्टनवर त्याला मोठी खेळी करण्याची संधी असणार. मिडल ऑर्डरमध्ये दिनेश कार्तिक दमदार कामगिरी करत असून त्याच्या सोबतीला असणार आहे ते कॅप्टन धोनी, सुरेश रैनासह रवींद्र जाडेजासारखे आक्रमक बॅट्समन... त्यामुळे पाकिस्तानी बॉलर्सना भारतीय बॅटिंगला वेसण घालण्याकरता घाम गाळावा लागणार आहे.
पाकिस्तानी बॉलिंगची प्रमुख मदार असणार आहे ती मोहम्मद इरफान, जुनैद खान आणि वहाब रियाझ या डावखु-या फास्ट बॉलिंग त्रिकूटावर... तर स्पिन डिपार्टमेंटमध्ये सईद अजमल, मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांना जबाबदारीने बॉलिंग करावी लागेल. एखाददुसरा अपवाद वगळता भारताच्या तुलनेत पाकिस्तानी बॅटिंग लाईनअप बेभरवशाची आहे. दोन्ही लीग मॅचेसमध्ये पाक बॅटिंग ढेपाळली होती. इम्रान फरहात आणि नासिर जमशेद यांना पाकिस्तानला मोठी ओपनिंग करून द्यावी लागणार आहे तर मिडल ऑर्डरमध्ये मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, उमर अमिन, कामरान अकमलसह कॅप्टन मिसबाह उल हकवर मोठी खेळी करत भारताविरूद्ध मोठं टार्गेट उभारून देण्याची जबाबदारी असेल. पण भारतीय बॉलिंग ऍटॅक पाहता पाकिस्तानी बॅट्समन्सना नक्कीच घाम फूटणार. कारण उमेश यादव, ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या त्रिकूटासह... आर. अश्विन आणि टीम इंडियाचा सर रवींद्र जाडेजा आपल्या स्पिनची जादू दाखवत पाकिस्तानी बॅट्समन्सची परिक्षा घेण्यास सज्ज असतील. त्यामुळे या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता फॅन्सना असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.