www.24taas.com, मुंबई
हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी क्रांतीचं वर्ष ठरणार आहे. कारण हॉलिवूडचे टेक्निशिअन्ससुध्दा आता मराठी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. वीर बाजीप्रभू देशपांडे या सिनेमामध्ये काही हॉलिवूडचे टेक्निशिअन्स काम करत आहेत.
विषयांच्या वैविध्यततेने संपन्न असलेला मराठी सिनेमा आता खरोखरच कात टाकतोय. नेहमी प्रगत तंत्रज्ञाच्या अभावामुळे मागे पडलेल्या मराठी सिनेमानेही आता आपल्या कक्षा रुंदावल्यात कारण सनद माने निर्मित वीर बाजीप्रभू देशपांडे या सिनेमासाठी हॉलिवूडचे टेक्निशिअन्स काम करत आहेत. अँड्र्य़ू आणि सबेस्टिअन या दोन टेक्निशिअन्सची जादू या सिनेमामध्ये दिसणार आहे. 300, हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स, कॉन्टम ऑफ सोलॅस यासारख्या हॉलिवूडपटासाठी त्यांनी आजवर काम केलंय..
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा होणार आहे. तसंच या सिनेमाचं शूटिंग परदेशी होणारे त्यामुळे सहाजिकच या सिनेमाचं बजेटही वाढणार आहे.
या सिनेमातील बाजीप्रभूच्या भूमिकेसाठी अजय देवगणच्या नावाची चर्चा आहे तर शिवाजी महाराजांची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना ऑफर करण्यात आली आहे. एकूणच अजय देवगण आणि रजनीकांत यांच्या अभिनयाला हॉलिवूडच्या तंत्रज्ञांचीदेखिल जोड मिळतेय. त्यामुळे 2013 मध्ये मराठी सिनेसृष्टीच्या क्षितीजावर एक दर्जेदार मराठी सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार हे नक्की