www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलाही अमेरिकेत वंशभेदाला सामोरं जावं लागलंय... ही गोष्ट खुद्द प्रियांकानंच उघड केलीय.
`वॉल स्ट्रीट जर्नल`ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकानं हा खुलासा केलाय. सप्टेंबर २०१३ मध्ये प्रियांकानं `इन माय सिटी` हे आपलं गाणं फूटबॉल मॅचच्या अगोदर अमेरिकेतील प्रेक्षकांसमोर सादर केलं होतं. या कार्यक्रमानंतर प्रियांकाला खूप सारे मेल आणि ट्विटस् मिळाले. यामध्ये तिला `अरब दहशतवादी` म्हणूनही संबोधण्यात आलं होतं. `अमेरिकेत तुझं काहीही काम नाही, अमेरिकन टीव्हीपासून दूर राहा` अशा शब्दांत यानंतर प्रियांकाची हेटाळणी करण्यात आली.
प्रियांकानं `वॉल स्ट्रीट`ला दिलेला हा इंटरव्ह्यू यू ट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय आणि शेअरदेखील केला जातोय. `मी प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर अशा प्रकारच्या कठिण प्रसंगांना मला अनेक वेळा सामोरं जावं लागलं... आणि अभिनयापेक्षा अशा गोष्टींवरच जास्त चर्चा होते... मला माहित आहे फुलासोबत इथं दगडही फेकून मारले जातात` अशी प्रतिक्रिया यावर प्रियांकानं व्यक्त केलीय.
वंशभेदाबद्दल बोलताना प्रियांका म्हणते, `आपलं काम सुरू ठेवा, टीकाकारांचं आणि पाय खेचणाऱ्यांची तोंड आपोआप बंद होतील... मेहनत करत राहा.... यश मिळवत राहा कारण, अशा बाष्कळ गोष्टी बोलणाऱ्यांपेक्षा हजारो पटीत असेही लोक आहेत जे तुम्हाला आणि तुमच्या कामाला पाठिंबा देतात`.
`माझ्याकडे दोन पर्याय होते... पहिला म्हणजे, मला काळी, दक्षिण भारतीय आणि दहशतवादी संबोधलं गेलं होतं... तू गोरी नाहीस, मग तू न्य यॉर्क फुटबॉल लीगमध्ये काय करतेयस? असं म्हणत खिल्ली उडवली गेली होती... त्या ई-मेलकडे मी लक्ष द्यावं किंवा त्या ई-मेल्सकडे पाहावं जे एनएफएल नेटवर्कला पाठविले जात होते. ज्यामध्ये माझ्या कामाची, माझ्या गाण्याची प्रशंसा केली जात होती.... आणि मी दुसरा पर्याय निवडला` असंही प्रियांकानं स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.