ऑस्कर शर्यतीतून ‘बर्फी’ आऊट...

अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ ऑस्करच्या घोडदौडीत मागे पडलीय. ८५ व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमधून ‘बर्फी’ बाहेर पडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 22, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, लॉस एन्जेलिस
अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ ऑस्करच्या घोडदौडीत मागे पडलीय. ८५ व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमधून ‘बर्फी’ बाहेर पडलीय. विदेशी भाषेतील सर्वोत्तम सिनेमाच्या श्रेणीमध्ये या सिनेमाला जागा मिळाली नाही. ऑस्कर पुरस्कारांच्या संक्षिप्त सूचीमधून हा खुलासा झालाय.
‘बर्फी’मध्ये अभिनेता रणबीर कपूरनं एका मुक्या-बहिऱ्या मुलाची भूमिका पार पाडलीय तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका ऑटिस्टिक पीडित मुलीच्या भूमिकेत दिसलीय. बॉक्स ऑफिसवर या फिल्मचा चांगलाच बोलबाला झाला होता. विदेशी भाषेतील सर्वोत्तम सिनेमाच्या श्रेणीमध्ये जगभरातील ७१ सिनेमांची निवड करण्यात आलीय. तर संक्षिप्त सूचीमध्ये फक्त नऊ सिनेमांना स्थान मिळालंय. शेवटच्या पाच जागांसाठीही या सिनेमांमध्ये स्पर्धा होणार आहे.
एमोर (ऑस्ट्रीया), वार विच (कॅनडा), नो (चिली), ए रॉयल अफेअर (डेन्मार्क), द इन्टचेबल्स (फ्रान्स), द डीप (आइसलँड), कॉन-तिकी (नॉर्वे), बियाँड द हिल्स (रोमानिया) आणि सिस्टर (स्वित्झर्लंड) या नऊ सिनेमांना या श्रेणीमध्ये स्थान मिळालंय. नामांकनांची शेवटची सूची १० जानेवारी रोजी घोषित केली जाणार आहे.