‘रामलीला’ काढून टाका – हायकोर्टाचे आदेश

‘गोलियों की रासलीला – रामलीला’ या सिनेमातून ‘रामलीला’ हा शब्द हटवण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेत. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 14, 2013, 09:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जबलपूर
‘गोलियों की रासलीला – रामलीला’ या सिनेमातून ‘रामलीला’ हा शब्द हटवण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेत. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.
उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश के के लाहोटी यांच्यासहीत न्यायाधीश सुभाष काकडे यांच्या खंडपीठानं या सिनेमाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिलाय.
खंडपीठानं इरोज फिल्म इंटरनॅशनलच्या मुख्य कार्यपालन अधिकारी (सीईओ) किशोर लुल्ला, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेत्री दीपिका पदूकोण, अभिनेता रणवीर सिंह यांच्यासहीत इतरांना नोटीस देऊन उत्तर मागितलंय. याचिकेवर पुढची सुनावणी २२ नोव्हंबर रोजी होणार आहे.

वकील आनंद चावला तसंच अमित कुमार साहू यांच्याकडून दाखल केलेल्या याचिकेमध्ये या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. ‘रामलीला’ हा शब्द हिंदूंच्या भावनांशी जोडलेला असून त्यामुळे समुदायाच्या भावनेला धक्का पोहचू शकतो, असा आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतलाय. इरोज फिल्म इंटरनॅशनलनं ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ या नावानं हा सिनेमा बनविलाय... त्यामुळे भारताच्या संस्कारिक मूल्य आणि हिंदूच्या भावनेला धक्का पोहचू शकतो, असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयात म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.