www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. परंतू तिच्या मृत्यूचं गूढ मात्र कायम आहे. जियानं ‘लव्ह ट्रॅगल’ला कंटाळून आत्महत्या केली का? यावर पोलीस तपास करत आहेत.
फार कमी वेळात बड्या स्टार्सबरोबर काम करून उंचावर जाऊन त्यापेक्षा वेगानं खाली येणाऱ्या करिअरमुळेही जिया तणावग्रस्त होती. ‘प्रोफेशनल लाईफ’मध्ये असफलतेच्या स्थितीत असलेल्या जियाची ‘पर्सनल लाईफ’ही स्थिर नव्हती, असं तिच्या मृत्यूनंतर स्पष्ट झालंय.
२५ वर्षांची जिया गेल्या एका वर्षापासून २२ वर्षीय सूरज पांचोली बरोबर डेटी करत होती. सूरज पांचोली हा आदित्य पांचोली यांचा मुलगा... सोमवारी गळफास लावण्यापूर्वीचा आठवडा जियानं सूरजबरोबरच घालवला होता. हे दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये होते. या दोघांच्या नातेसंबंधांची माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही होती.
सोमवारी दोघांनी एकमेकांना तब्बल ६३ वेळा फोन केले होते. दोघांनी एकमेकांना अनेक एसएमएसही पाठवले होते. या एसएमएसवरून सूरज जियाला टाळत असल्याचं लक्षात येतं. यातच जियानं ‘यू आर गेटींग टू कोल्ड’ (तू खूप भावनाहीन झालास) असा मॅसेज पाठवला होता.... आणि हाच जियानं सूरजला पाठवलेला शेवटचा मॅसेज होता.
फोनवर दोघांचं भांडण झाल्यानंतर जिया सूरजच्या घरीही गेली होती. तेव्हा तिला दरवाजातच सूरज त्याच्या आई-वडिलांबरोबर बिझी असल्याचं सांगण्यात आलं आणि दरवाजातूनच जिया तिच्या घरी परतली. याअगोदर जियानं सूरजला आपल्याला एक फिल्म मिळाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सूरजनं पाठवलेला फुलांचा गुच्छ तिनं स्वीकारला होता पण थोड्याच वेळात तीनं तो आपल्या बिल्डिंगच्या वॉचमनला कचरा पेटीत फेकून यायला सांगितलं होतं.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात नीलू नावाच्या एका मुलीचंही नाव पुढे येतंय. सूरज आणि नीलूमध्येही नातेसंबंध होते आणि याचमुळे जियाच्या तणावात आणखी वाढ झाली होती, असं समजतंय. जियानं मृत्यूपूर्वी शेवटचं बोलणं सूरजशीच केलं होतं. पोलिसांच्या चौकशीत सूरजनं आपले आणि जियाचे संबंध असल्याचं मान्य केलंय. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार जियाचा मृत्यू फाशी घेतल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.