www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असा दावा तिची आई राबिया यांनी केलाय. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात साक्ष घेतलेल्या साक्षीदारांचे स्टिंग ऑपरेशन करून यातील सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्नही रबिया यांनी केला आहे. तर दुसरीकडे सुरजवर खुनाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणीही रबिया यांनी केली आहे.
जियाच्या मृत्यूनंतर राबिया यांनी चौकशी मागणी केली. तिने आत्महत्या केलेली नाही. तर तिचा खून झालाय, असा दावा करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवावा, अशी मागणी जियाची आई रबिया यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. यासाठी रबिया यांनी याचिका दाखल केली आहे.
जिया खान प्रकरणी पोलिसांनी साक्ष घेतलेल्या साक्षीदारांचे स्टिंग ऑपरेशन करून यातील सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्नही रबिया यांनी केला आहे. यासाठी रबिया यांनी साक्षीदार डॉक्टर, फुलविक्रेता व एका साक्षीदाराशी संपर्क साधला. यातील डॉक्टरांनी जिया मानसिक तणावाखाली नसल्याचे सांगितले. तसेच फुलविक्रेत्यानेदेखील सुरज पांचोलीने प्रेमसंबंध तुटल्याची फुले जियाला पाठवली नसल्याचा दावा केला. त्यामुळे जियाने आत्महत्या केली नसून ही तिची हत्या झाल्याचे रबिया यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तपास करून जियाने आत्महत्या केल्याचे आरोपपत्र दाखल केले. त्यात सुरजवर या आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
गेल्या वर्षीदेखील याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी याचिका रबिया यांनी केली होती. मात्र रबिया यांचा जबाब नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आली. दरम्यान, या खटल्याच्या पहिल्याच सुनावणीला सुरजने यातून दोषमुक्त करावे, अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयाकडे केला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.