‘जब तक…’ ठरला यशजींचा अखेरचा चित्रपट

१३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा असलेला ‘जब तक है जान’ हा बॉलिवूडचे ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 21, 2012, 07:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
१३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा असलेला ‘जब तक है जान’ हा बॉलिवूडचे ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय. बॉलिवूडचा रोमॅन्टिक बादशाह शाहरुख खान आणि त्याची नवी प्रेम कहाणी या चित्रपटातून लवकरचं प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘जब तक है जान’चा त्याचा प्रोमो पाहून तर हा एखादा रहस्यमय चित्रपट आहे की काय? असं प्रेक्षकांना वाटतंय. बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आपल्या प्रत्येक प्रेम कहाणी मध्ये काहीनाकाही तरी ट्विस्ट घेऊन येतोच. कधी कॅन्सर सारख्या भयंकर आजाराला झुंज देत असताना शाहरूख आपल्या प्रेमाला दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात सहभागी करतो, तर कधी स्वतःच लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि नव्या नात्याची सुरूवात करतो. ऐन दिवाळीत ‘जब तक है जान’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर येण्यास सज्ज झालाय. या चित्रपटात यशजींनी शाहरूखची ‘ऑन स्क्रिन प्रेमकहाणी’ एका नव्या अंदाजात दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा चित्रपट यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट ठरल्यानं आता तर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढलीय.
जब तक है जान च्या पहिल्या लूकमध्ये शाहरूख आर्मी ऑफिसर प्रमाणे भासतो, तसेचं नुकत्याच प्रर्दशित करण्यात आलेल्या ‘छल्ला कि लभ’ या गाण्यात शाहरूख रस्त्यावर गाणं गाताना लोकांकडून पैसे गोळा करताना दिसतो. एक आर्मी ऑफिसर असं रस्त्यावर गाणं गाऊन पैसे का कमवेल? आणि अशाच प्रकारच्या अनेक रहस्यांनी यशजींचा हा आगामी चित्रपट भरलेला आहे. असंही म्हटलं जातयं की शाहरूखनं या चित्रपटात डबल रोल केलाय. शाहरूखसोबत कतरिना आणि अनुष्का शर्मा ऑनस्क्रिन रोमांस करताना दिसणार आहेत. या दोघांशी प्रेम करणारा शाहरूख एकच आहे की वेगवेगळा? हे रहस्य जाणण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
नुकताच, २७ सप्टेंबर रोजी यश चोप्रा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी, ‘जब तक है जान’ या चित्रपटानंतर आपण सिनेसृष्टीतून निवृत्ती घेणार असल्याचं खुद्द यशजींनी जाहीर केलं होतं. पण, या चित्रपटाचं यश चाखण्यापूर्वीच यश चोप्रा यांनी बॉलिवूडला राम राम ठोकलाय. ‘जब तक है जान’ म्हणत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच चित्रपटाला वाहिलं.