www.24taas.com, मुंबई
सलमान खानच्या ‘एक था टायगर’ सिनेमावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी सिनेमाचे निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक कबीर खान यांच्यासह ४ जणांवर कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लेखक आनंद पांडा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, आपली कथा चोरून त्यावर यशराज फिल्मने एक था टायगर सिनेमा बनवला आहे. पांडा म्हणाले की २०११ साली मी ही कथा घेऊन यशराज फिल्म्सच्या ऑफिसात गेलो होतो. त्यानंतर पुढील ५० दिवस माझी स्क्रीप्ट मी त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवली होती. ५० दिवसांनी माझ्या स्क्रीपटची कॉपी मला परत करण्यात आली.
आनंद यांनी लेखक संघातही या संदर्भात तक्रार केली होती. सिनेमाची कथा आनंद पांडा यांच्या कथेशी खूप मिळती-जुळती असल्याचं लेखक संघानेही मान्य केलं आहे. त्यानुसार सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक इत्यादी ४ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पांडा यांच्यारडील स्क्रीप्ट घेतल्यावर ती कथा कॉपी केली गेली असण्याची शक्यता आहे. सिनेमात कथा लेखनाचं श्रेय संयुक्ता आणि निलेस या जोडीला देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनाही पोलीस चौकशीला सामोरं जावं लागेल.