आज होणार `विश्वरुपम`चा फैसला...

कमल हसनचा बहुचर्चित चित्रपट `विश्वरुपम` तमिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार की नाही? याबाबत मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी आज होणार आहे.

Updated: Jan 29, 2013, 09:36 AM IST

www.24taas.com, चेन्नई
कमल हसनचा बहुचर्चित चित्रपट `विश्वरुपम` तमिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार की नाही? याबाबत मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी आज होणार आहे.
हायकोर्टचे न्यायाधीश, सिनेमाशी संबंधित काही जण आणि मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पाहिलंय. २५ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या सिनेमावर तमिळनाडू राज्य सरकारनं १५ दिवसांची स्थगिती दिली आहे. कर्नाटकमध्येही सिनेमाचं प्रदर्शन अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. कर्नाटक पोलिसांनी हा सिनेमा पाहिलाय. मात्र, प्रदर्शनाबाबत आपलं मत कळवलेलं नाही. कर्नाटकमध्ये हा सिनेमा एकाच वेळी ४० थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये १० थिएटर केवळ बेंगळुरुमधील आहेत. चित्रपटात मुस्लिम समाजाबाबत चुकीचं चित्र रंगवल्याचा आरोप काही संघटनांनी केलाय.

‘विश्वरुपम’ केरळ, हैदराबाद, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भागात प्रदर्शित करण्यात आलं होता. पण, या सिनेमाच्या पहिल्या प्रदर्शनानंतर लगेचच इथे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. याच सिनेमावर २६ जानेवारी रोजी मलेशिया सरकारनंही बंदी आणलीय. या सिनेमाच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या रजनीकांत, अजित कुमार, पार्थेपन आणि सिनेमा दिग्दर्शक भारतीराजा, सिनेमा निर्माते मुक्त श्रीनिवासन यांनी मुस्लिम संघटनांना यावर ‘विरोध करा पण शांतेतेच्या मार्गानं’ असं आवाहन केलंय.