www.24taas.com, मुंबई
सिनेसृष्टीत सर्वोच्च मानल्या जाणा-या ऑस्कर पुरस्कारांमध्ये परदेशी चित्रपटाच्या वर्गवारीत भारताकडून बर्फी या सिनेमाची निवड झालीय. तरीही यंदाच्या ऑस्करच्या शर्यतीत ‘देऊळ’ हा मराठी सिनेमाही सहभागी होण्याची शक्यता आहे.कारण देऊळ चित्रपटाचे निर्माते अभिजीत घोलप ऑस्करसाठी स्वतंत्रपणे प्रवेशिका पाठवण्याच्या विचारात आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर देऊळ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतही यश मिळवू शकेल, अशी निर्मात्यांना आशा वाटतेय. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीतून देऊळ अद्याप बाहेर पडला नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आपण या पुरस्कारांसाठी स्वतंत्रपणे प्रवेशिका सादर करण्याच्या विचारात असल्याचे देविशा फिल्म्सचे अभिजित घोलप यांनी म्हटलंय. ‘राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत उतरताना आम्ही संपूर्ण नियोजनानिशी उतरलो होतो. मात्र, ऑस्करसाठी आपला चित्रपट निवडला जाण्यास काय करावे लागते, हे आम्हाला ठाऊक नव्हते. आमचा अभ्यास थोडा कमी पडला. ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणा-या चित्रपटात भारतीयत्त्व मांडले गेले पाहिजे, अशी साधारण अपेक्षा असते. ‘बर्फी’ हा या अर्थाने भारतीय चित्रपट नाही, तो जागतिक पातळीवरील चित्रपट म्हणू शकतो. त्याउलट ‘देऊळ’मध्ये अस्सल भारतीयत्त्व प्रतिबिंबित होतं’ असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.