करीनाच्या संगीत सोहळ्याला अमृता सिंग उपस्थित!

करीनाच्या संगीत सोहळ्यालाच जवळपास अर्धं बॉलिवूड उपस्थित होतं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे तमाम कलाकार तर उपस्थित होतेच, पण आश्चर्य म्हणजे या प्रसंगी सैफ अली खानची पूर्व पत्नी अभिनेत्री अमृता सिंगदेखील उपस्थित होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 15, 2012, 06:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाची धूम सध्या सगळ्या सिनेसृष्टीत आहे. कपूर आणि खान दोन्ही कुटुंबं सध्या लग्नाच्या तयारीमध्ये मग्न आहेत. मोटमोठे कलाकार या लग्नाला उपसस्थित राहाणार आहेत.
करीनाच्या संगीत सोहळ्यालाच जवळपास अर्धं बॉलिवूड उपस्थित होतं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे तमाम कलाकार तर उपस्थित होतेच, पण आश्चर्य म्हणजे या प्रसंगी सैफ अली खानची पूर्व पत्नी अभिनेत्री अमृता सिंगदेखील उपस्थित होती.
रविवारी रात्री करीना कपूरच्या संगीत सोहळ्यामध्ये अमृता सिंग आणि तिची आणि सैफ अली खानची कन्या सारा अली खानही दिसल्या. सारा आपली आत्या सोहा अली खानसोबत आली होती. सोहा सोबत यावेळी कुणाल खेमूदेखील उपस्थित होता.

याशिवाय संगीत सोहळ्यात नीतू सिंगदेखील हजर होती. अभिनेत्री नीतू सिंग ही करीनाची काकू आहे. मात्र करीनाची आई बबिता आणि नीतू सिंग यांच्या फार पूर्वीपासून चालू असलेल्या भांडणांमुळे दोन्ही कुटुंब एकमेकांशी कुठलाच संबंध ठेवत नव्हती. मात्र करीनाच्या संगीत सोहळ्यात नीतू सिंगदेखील कटुता विसरून सामील झाली होती.
मात्र, या सर्वांमध्ये चर्चा रंगली ती अमृता सिंगच्या उपस्थितीचीच. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग हिच्याशी सैफ अली खानने काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर सैफ अली खान आता करीना कपूरशी विवाहबद्ध होत आहे. अशा प्रसंगी तेथे अमृता सिंगनेही उपस्थित असणं सहाजिकच लोकांसाठी आश्चर्यकारक होतं. मात्र आपल्या माजी नवऱ्याच्या नववधूला शुभेच्छा देण्यासाठी अमृता सिंग संगीत सोहळ्यात आली होती.