www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अमिताभ बच्चन यांचा ७१वा वाढदिवस आणि लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला ७१वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा अनोखा योग यंदा जुळून आलाय. याचनिमित्तानं पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त ‘ह्रदयेश आर्ट्स’तर्फे अमिताभ बच्चन यांचा विशेष गौरव करण्यात आला.
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात येणार होता. मात्र तब्येत खराब असल्यानं लतादीदी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते हा पुरस्कार महानायकाला देण्यात आला.
यावेळी बोलतांना ` मी मुंबईकर आहे, या शहरानं मला सर्व काही दिलं, या शहराचा मी ऋणी आहे `, अशा भावना बिग बी अमिताभ यांनी व्यक्त केल्या. `सध्या मी मराठी शिकतो आहे. मराठीवर प्रभुत्व मिळवण्याचा माझा प्रयत्न असून पुढच्या कार्यक्रमात मी मराठीतूनच बोलेन`, असंही बिग बी म्हणाले.
`लतादीदींनी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर भरभरून प्रेम केलं. आजही हा स्नेह कायम आहे. त्यामुळं त्यांनी जेव्हा-जेव्हा मला आमंत्रित केलं, तेव्हा मी त्यांच्या कार्यक्रमात आनंदानं सामील झालो`, असे भावूक उद्गार अमिताभ यांनी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना काढले. या सोहळ्याला जया बच्चनही उपस्थित होत्या.
लतादीदी आणि अमिताभ ही दोन्ही शिखरे असून भारतीय कलाविश्वात त्यांचं योगदान अमूल्य असल्याचं मत सुभाष घई यांनी नोंदवलं. तर अमिताभ यांच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करणं हाच पुरस्कार देण्यामागचा विचार असल्याचं हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.