` मर्डर ३`... आदितीसाठी एकदा पाहू शकाल!

‘मर्डर ३’ सिनेमाचं कथानक एखाद्या परदेशी सिनेमाची चोरलीय की काय, असं तुम्हालाही वाटू शकतं. कारण, हा सिनेमा स्पॅनिश सिनेमा ‘हिडन फेस’वर बेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 16, 2013, 11:12 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘मर्डर ३’ सिनेमाचं कथानक एखाद्या परदेशी सिनेमाची चोरलीय की काय, असं तुम्हालाही वाटू शकतं. कारण, हा सिनेमा स्पॅनिश सिनेमा ‘हिडन फेस’वर बेतलाय. ‘मर्डर ३’ हा ‘द हिडन फेस’चा ऑफिशिअल रिमेक असल्याचं अगोदरच गवगवा करण्यात आला होता. गुन्हा आणि सेक्स यांचं मिश्रण आपल्याला मर्डर ३ मध्येही दिसून येतं. गुन्हा, थोडासा सस्पेन्स आणि त्याला सेक्सचा तडका... हीच तर खरी महेश भट्ट्च्या सिनेमांची खासियत ठरते.
या सिनेमाचं कथानक थोडं ठिक-ठाक म्हणजे अपेक्षेपेक्षा थोडं बरं वाटतं... पण, सिनेमाला मनोरंजक बनवण्याच्या नादात काही गोष्टी कच्च्या राहिल्यात तर काही जरा जास्तच ‘पकल्यात’. बरेचसे सीन बराच काळ ताणत धरले जातात ज्याला पाहून प्रेक्षकांनाही पकल्यासारखंच वाटतं. सिनेमाची स्क्रिप्ट कुठे भटकतेय हे प्रेक्षक पूर्णवेळ शोधतच राहतो. ‘सस्पेन्स थ्रीलर’ सिनेमा असा दावा करण्यात आला असला तरी त्यात ‘सस्पेन्स’ही नाही आणि ‘थ्रीलर’ही...
या सिनेमात रणदीप हुड्डा एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसतो. त्याला एका वेट्रेसबरोबर प्रेम होतं... ही वेट्रेस म्हणजे सारा लॉरेप... दोघांवरही प्रेमाचा ताप चढायलाच लागतो की मध्येच साराला रणदीपच्या पूर्व प्रेमिका गायब असल्याची भनक लागते आणि त्यामुळे पोलिसही तिच्या मागे लागतात. त्यामुळे सिनेमाचं कथानक आता एका ‘मर्डर मिस्ट्री’कडे वळायला लागतं. सिनेमाच्या दुसऱ्या तासात मग कथानक दुसरं वळण घेतं आणि मग प्रेक्षकांमध्ये थोडीफार उत्सुकता दिसून येतं. त्यामुळे सिनेमाचा दुसरा भाग पहिल्या भागाइतका कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमात अनेक सीन असे आहेत की जे नसते तरी चाललं असतं... किंबहुना काही बिघडलंच नसतं.

प्रीतम, रॉक्सेन बँडचं संगीत हे भट्ट कॅम्पच्या सिनेमांचं वैशिष्ट्यं... या सिनेमातही संगीतानं पूरेपूर साथ दिलीय. अभिनयाच्या बाबतीत रणदीप ठिक-ठाक वाटतो. अदिती राव आणि सारा यांचं कामही अपेक्षेपेक्षा बरंच आहे. आदिती राव - हैदरी त्यातल्या त्यात भाव खाऊन जाते.
शेवटी काय तर, हा सिनेमा तुम्ही फार फार तर एकवेळ पाहू शकता. मनोरंजनाच्या बाबतीत फार अपेक्षा न ठेवता वेळ घालवण्यासाठी गेलातच तर तुमचा वेळ निघून जाईल, एव्हढंच...