अभिनेते सचिन खेडेकर, www.24taas.com
‘आजचा दिवस माझा’ आणि ‘आजचा माझा दिवस...’ याची नक्कीच सांगड घालावी लागेल. कारण त्यामागची माझी भावना देखील वेगळी आहे. ‘आजचा दिवस माझा’ हा सिनेमा रिलीज झाला. आणि आजच्याच दिवशी मला आणखी नवं काही करण्यासही मिळालं. ‘झी २४ तास’ने मला सेलिब्रेटी अँकर म्हणून जी संधी दिली त्याबाबत खरंच त्यांचे आभार मानलेच पाहिजे. आज महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थिती म्हणावी तितकीशी काही चांगली नाही. राजकारण म्हंटलं की ते वाईटच अशी आपल्या सगळ्यांची समजूत झालेली आहे. आणि यावरच भाष्य करणारा आमचा सिनेमा आहे. ‘आजचा दिवस माझा.’
‘आजचा दिवस माझा’ हा राजकीय पार्श्वभूमी असेलेला सिनेमा आहे. माणूसकीची गोष्ट सांगणारा असा सिनेमा आहे. आपल्याकडे राजकारणी लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक असतो. माध्यमातून देखील त्यांच्याकडे अशाच नकारात्मक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जात असतो. मात्र एका चौकटीत बसूनच राजकारण्यांना देखील कामं करावी लागतात. आणि त्यामुळेच त्यांच्यावर देखील अनेक बंधने असतात. ही बंधने पाळतानाच मर्यादेचे उल्लंघन होणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. आणि त्यामुळेच नेत्यांची नकारात्मक छबी काहीवेळेस तयार होत असते.
सामान्य माणासासाठी झटणारा असाच मुख्यमंत्री राज्यासाठी असावा. त्यामुळे मुख्यमंत्री जर तसे असतील तर महाराष्ट्राचं चित्र नक्कीच वेगळं असेल. राजकीय पटावरील सिनेमा सामना आणि सिंहासन यानंतर म्हणावे तसे मराठी चित्रपट झाले नाही. आणि त्यामुळेच राजकारणावर बेतलेला असाच हा सिनेमा आहे. एका सामान्य व्यक्तिच्या कामासाठी मुख्यमंत्री संपूर्ण रात्रभर मंत्रालय चालू ठेवतो. आणि यातच सिनेमाचं कथानक दडलेलं आहे. खऱ्या अर्थाने चित्रीकरण करताना देखील माझ्या मनात हेच येत होतं की, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील असेच काम करावे. आणि प्रत्येक दिवस माझाच असेल हे दाखवून दिलं पाहिजे. आपल्याकडे राजकारणी प्रत्येक दिवस त्यांचाच असेल यासाठी झगडताना दिसतात. मात्र खुर्ची टिकवण्याच्या या स्पर्धेत सामान्यांचा भावभावनांचा विचार केला जावा अशीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.
शब्दांकन - रोहित गोळे