मुंबई : ( जयवंत पाटील, झी २४ तास) मराठा मोर्चावर सोशल मीडियात बेधडक-बिनधास्त प्रतिक्रिया येत आहेत. प्रतिक्रिया देणारी मंडळी २५ ते ३५ वर्ष वयोगटातील जास्त आहे. अशा एका नव्या पिढीला मराठा-दलित समाजाविषयी जास्त माहिती होईल, आणि ते योग्य दिशेने विचार करतील, यासाठी हा ब्लॉग. (भाग २)
अॅट्रॉसिटीचा 'तोटा' गरीब 'मराठा' शेतकऱ्याला नाही, आणि 'फायदा' गरीब 'दलित' शेतकऱ्यालाही नाही. गरीब या अर्थाने जे सरळमार्गी आहेत, ज्यांना गावच्या राजकारणात रस नाही असे. मात्र ज्यांना गावात राजकारण करायचंय, त्यांना अट्रॉसिटी कायदा आपल्या सोयीप्रमाणे वापरायचाय.
दुर्देवाने लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकशाहीत, अट्रॉसिटी कायदा दलितांनी दलितांसाठी जास्त प्रमाणात वापरला नाही. तर दलितांचा वापर करून इतरांनी, इतरांवर कुरघोडी करण्यासाठीच जास्त वापरला.
दलित-मराठ्यांचे गावोगावी पिढ्यांपिढ्या चांगले संबंध आहेत. हे मैत्रीचे संबंध ३-३, ४-४ पिढ्यांपासून आहेत. एकमेकांचा मानसन्मान देखील तोंडावर का असेना ही मंडळी राखते. एकमेकांच्या पंगतीत हे जेवतात-वाढतात.
मराठा-दलितांचे शेताचे बांधाला बांध आहेत. कदाचित अनेक ठिकाणी दलित-मराठ्यांची आताची पिढी बांधावर जाऊन उभी राहिली, तर ते एकमेकांना ओळखणारही नाहीत, की हा आपला शेजारी आहे.
बाबासाहेबांचं आवाहन कामी आलं
कारण कामधंद्याच्या शोधात दलितांच्या पिढ्या अनेक वर्षापासून शहरात गुंतून आहेत. यात दलितांची संख्या सर्वात जास्त असेल. कारण बाबासाहेबांनी दलितांना शहराकडे चला, असं आवाहन केलं होतं. त्यावेळी दलित मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतरीत झाले, आज हा समाज प्रगतीवर तर आहेच पण जागृतही आहे.
शहरात गेल्याबरोबर जो दलित समाज मजुरी करत होता, त्यांची दुसरी पिढी आता खासगी-सरकारी नोकऱ्यांवर आहे. यात खासगी नोकरी करण्याचं प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने आरक्षणाशिवाय नोकरी करणारी दलित मंडळी.
दलितांपूर्वीच बाह्मण समाज देखील मोठ्या प्रमाणात, खेड्याकडून मोठ्या शहराकडे स्थलांतरीत झाला. अनेक गावात तुम्हाला आता ब्राह्मण समाजाचं एखादचं कुटुंब दिसेल.
तुलनेने मराठा मोठ्या प्रमाणात गावातच शेती सांभाळत राहिला, मराठा समाजाला सर्वात मोठा फटका मागील २० वर्षात शेतीत बसला, शेतीचं ध्येय धोरण पाहिजे त्या प्रमाणात बदलली नाहीत, कृषि विद्यापिठाचं संशोधन बांधावरच पोहोचलं नाही, शेती पारंपरिकच राहिली. कृषी कंपन्या मात्र गबर झाल्या.
शेतीत सतत तोटा होत असल्याने, मराठा समाजातील युवा पिढी देखील मागील १५ वर्षात मोठ्या प्रमाणात शहरात नोकरीसाठी स्थलांतरीत झाली. आरक्षणाशिवाय शिक्षण घेतं मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या मुलांनी आयटी क्षेत्रात स्थान मिळवलं आहे.
आता ग्रामीण शिक्षण देखील शहराच्या शिक्षणाच्या तुलनेत लोकांना निकृष्ट वाटायला लागलंय, मात्र हे शिक्षण सुधारण्याची गरज असताना, सर्वानी आता गावापासून स्वत:ला दूर ठेवण्यास सुरूवात केली आहे.
शेतीत असलेल्या मराठा समाजाने आणि त्यांनी निवडून दिलेल्या मराठा लोकप्रतिनिधींनी ग्रामीण शिक्षण आणि शेतीच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केलंय.
सर्वसामान्य मराठा समाज शेतीवर अवलंबुन आहे, शेतीची सरकारी ध्येय-धोरणं सुधारली तर अनेक अडचणी सुटू शकतात. शेती सुधारली तर आरक्षण मागण्याचीच गरज पडणार नाही.
मराठ्यांनाच नाही, तर वतनदारीत जमीन मिळालेल्या दलितांनाही शहरात घुसमटावं लागणार नाही.
कोपर्डी हे मोर्च्यासाठी कारण झालं, कोपर्डी सारख्या घटनांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. याबाबतीय कायदा शिक्षा करण्याचं काम निश्चित करेल.
दलित जागृत आहेत, पण मराठा आजही जागृत नाहीत, कारण मोर्चा काढल्यावर फक्त शक्तीप्रदर्शन होणार आहे. आजवर मराठा समाज संख्येने जास्त असूनही कधीही शक्तिप्रदर्शन केलं नाही, पण शक्तिप्रदर्शनाने मराठा समाज इतर समाजापासून दूर जाणार आहे. लहान जातीसमूहांना एक येण्याची गरज असते, बहुसंख्य समाजाला नाही.
मराठ्यांनी आजही पंगती आवरत्या घेतल्या, लग्नासाठीची खरेदी कमी केली, थोडक्यात समाधान मानलं, लग्नातील चुकीच्या प्रथांवर पैसा खर्च करणे बंद केलं तरी, मानसिक दृष्या मराठा समाजातील मुली सुरक्षित होतील.
लग्नसोहळ्यातील आहेर सारखी प्रथा बंद झाली, तरी देखील मराठा समाजावर सर्वत्र चांगला परिणाम दिसून येणार आहे.
मराठा समाजाच्या मुली या मराठा समाजातील चुकीच्या खर्चिक प्रथांमुळे असुरक्षित आहेत. दुर्देवाने यावर जागृती व्हायला हवी पण यावर कुणीही जनजागृतीसाठी मोर्चा काढायला तयार नाही.