योगीराज महाराज गोसावी, पैठण : काळानुरूप स्वतःमध्ये जो योग्य ते बदल करुन घेतो तोच टिकतो हा सृष्टीचा नियम आहे. वारकरी संप्रदायातील "Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" हे पुढचे पाऊल सांप्रदायिक मंडळीनी सहर्ष स्वीकारले ही बाब महत्त्वपूर्ण आहे.
संतांचे सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचण्याचे कीर्तनादीकानंतरचे एक प्रभावी माध्यम म्हणून "Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" याकडे पहावे लागेल. भावी पिढीसाठी हा उपक्रम निश्चितच मैलाचा दगड ठऱेल.
"Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" हा एक अभिनव उपक्रम सर्व संप्रदायानुरागी मंडळींच्या सहकार्याने हजारो लोकांपर्यंत पोचला आहे. सोशल मीडियावर वायफळ गोष्टीसाठी वाया जाणारा वेळ आपण सत्कार्यासाठी देऊ शकलो अशी भावना अनेकानी व्यक्त केली हेच या कार्याचे प्राथमिक यश म्हणावे लागेल. सर्व पत्रकार बंधूंनी हे स्वतःचे कार्य समजुन कृतज्ञभावाने ते सर्व थरातील लोकांपर्यंत पोचवले त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार.
या परिक्षेचा हेतु वारकरी संप्रदायाची अभ्यासु व आचरणाशील फळी तयार व्हावी व 'सर्व संतांचे सर्व वाड्मय' लोकांना अभ्यासायला मिळावे हाच असुन 'पढतपंडित' बनविणे हा याचा उद्देश अजिबात नाही. जी मंडळी कोणत्याही कारणाने या अनमोल अशा तत्त्वज्ञानापासुन दुर राहिली आहे परंतु ज्यांची यात अजुनही काहीतरी करण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे येथे स्वागत आहे.
तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात दरवर्षी तीन याप्रमाणे एकुण नऊ परीक्षा घेण्यात येतील. उतीर्ण होणाऱ्या प्रत्येकास प्रतिवर्षी एक प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र हा केवळ औपचारिक भाग असुन आत्मिक समाधान हेच यात अपेक्षित आहे. संतवाङ्मयाचे श्रद्धेने अध्ययन करु इच्छिणारा कोणीही ही परीक्षा देऊ शकेल. प्रथमवर्षांच्या तीन परीक्षेसाठी रुपये 200 (दोनशे) ही फीस आकारण्यात येणार असुन ती कशी व कुठे जमा करायची ही माहिती Registration (रजिस्ट्रेशन) करणाऱ्याना लवकरच मिळेल. अभ्यासासाठी लागणारे ग्रंथ किंवा संदर्भग्रंथाचे नाव हे पीडीएफ (pdf) च्या स्वरूपात देण्यात येईल.
यात सहभागी होण्यासाठी सर्वानी http://santeknath.org/eknath/index.php या लिंकवर जाऊन त्वरीत आपले Registration करावे. याची शेवटची तारीख ३१/१२/२०१६ ही असुन जास्तीतजास्त लोकानी यात सहभागी व्हावे.