पानसरे, आम्हाला माफ करा !

Updated: Feb 24, 2015, 03:36 PM IST


संदीप साखरे

संदीप साखरे, झी मीडिया मुंबई : काँम्रेड गोविंद पानसरे गेल्याचं रात्री १२च्या सुमारास लोकलमध्ये कळलं.. त्यांच्यावर हल्ला झाल्यापासून हे घडू शकतं याची जाणीव होती.. पण आता त्यांना मुंबईत हलवलं..आता बरं वाटेलं.. असं वाटतं असतानाच अचानकपणे फोन आल्यावर सुन्न व्हायला झालं.. आपल्याच घरातलं कुणीतरी गेलं असं वाटलं.. मग सगळी यंत्रणा हलवावी लागली.. फोनाफोनी सुरु झाली.. आज रात्री, उद्या सकाळी काय, कुणी काय करायचं हे ठरवावं लागलं.. रात्री उशिरा ते पण संपलं ..घरी पोहचायला दीड वाजला.. उशिरापर्यंत पानसरेंचा मृत्यू डोक्यात घोळत राहिला...

नेमकं काय वाटलं, का अस्वस्थ वाटलं ?

आपण महाराष्ट्रात राहतो, आणि महाराष्ट्र सुसंस्कृत आहे..याचा गर्व वाटायचा..त्या विचारांनाच सुरुंग लागला.. दीड वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकरांवर हल्ला झाला तेव्हाही असचं वाटलं होतं.. आजही तेच वाटलं.. पाच सहा दिवसांपूर्वी पानसरेंवर हल्ला झाला, सकाळी बातमी आली तेव्हाही अशीच चिडचिड झाली.. महाराष्ट्र आहे की बिहार, उत्तरप्रदेश असं वाटायला लागलं..

गोविंद पानसरे हत्या : निषेधार्थ महाराष्ट्र बंद, राजकीय पक्षांचा पाठिंबा
गोविंद पानसरे 

विचारांना विचारांनी उत्तर द्यायचं असतं, सत्ता माज आणू शकत नाही आणि दहशतवादही पसरवू शकत नाही असं वाटलं.. आजूबाजूच्या अनेकांना तर पानसरे कोण आहेत, हेच मुळात माहीत नाहीत.. एरवी ऑस्ट्रेलियात झालेल्या टुकार भारत-पाक मॅचवर पांडित्यानं बोलणारी लोकलमधील मंडळीही त्यांच्या त्यांच्या विश्वातच होती.. आपल्या महाराष्ट्रात कोल्हापुरात एका दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचं, त्यात ही व्यक्ती जिवानिशी गेल्याचं त्यांच्या गावीही नव्हतं.. आज पण फक्त टीव्हीवर बातमी आहे आणि ब-याच वेळ चालली आणि त्यात त्यांच्यावर गोळीबार वगैरे झाला म्हणून थोड्या फार जणांना ते माहित असणारं.. पानसरे आपल्याला माहितच नाहीत, हे आपलं दुर्दैव.. सगळ्यांचंच..

त्याचवेळी या खोट्या प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या पानसरेंचं कौतुकही वाटलं.. त्यांचं साधेपण एरवीही जाणवायचंच पण ते यावेळी लख्खपणे जाणवलं.. एखादा विचार घेऊन शोषित, पीडित समाजासाठी सातत्यानं काम करत राहणं.. ही सोप्पी गोष्ट नाही.. एक चांगला कार्यकर्ता घडण्यासाठी काही वर्ष काही दशकं जावी लागतात.. एका मोठ्या तपश्चर्येनंतर हा कार्यकर्ता घडतो.. त्याच्या मायेची पाखर अनेकांवर असते.. त्याच्याशी बोलून प्रेरणा घेणारे, त्याच्या शब्दावर आयुष्य पणाला लावणारे आणि आयुष्याची दिशा मिळवणारे अनेक जण असतात.. त्यांच्यासाठी अशी माणसं गुरुस्थानी अगदी आपल्या आई-बापाच्या जागी असतात..एक कार्यकर्ता जाणं हे अशा अनेकांचं आई बाप जाण्यासारखं असतं..

असा कार्यकर्ता मग डावा की उजवा असं काही नसतं.. तो समाजाच्या भल्यासाठी झटत असतो.. त्याची वैचारिक बैठक नक्की असली तरी त्याचा विचार हा समाजाचं उत्थान आणि त्यासाठी सातत्यानं अविरत प्रयत्न असाच असतो.. वयाच्या ८०-८५ व्या वर्षीही मग ही मंडळी प्रवास करत असतात, अनेक जिद्दी व्यक्तिंच्या, प्रवाहाविरोधात काम करणा-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असतात, अस्वस्थतेत मार्गदर्शन करत असतात.. त्यांच्या केवळ भेटण्यानं, एखाद्या वाक्यानं, एखाद्या भाषणानं आपलं जगण्याचं भान समृद्ध होत असतं..

एकतरं बदलत्या काळात माणसं अधिकाधिक एकाकी होत असताना, सोशल मीडिय़ाच्या जगात संवाद हरपत असताना, समाजासाठी जीवन व्यथित करणारी पीढिच नाहिशी होत चालली आहे. ज्यांचे आदर्श ठेवावेत, ज्यांच्यासमोर वैचारिकदृष्ट्यातरी नतमस्तक व्हावं असं वाटतं, अशी माणसचं बोटांवर मोजण्याइतपत राहिलेली असताना, पानसरेंचा मृत्यू आणि तोही असा हे अधिक चटका लावणारा आहे.. तसचं केवळ नेत्याच्या मागे फिरण्याच्या, अंगात खादीचे पांढरे शर्ट आणि गळ्यात चैनी घालणा-या कार्यकर्त्यांची जंत्री असताना, आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहून समाजातल्या तळागाळात संघटन करणा-या पानसरेंचं वेगळेपण लख्ख जाणवतं.

'आम्ही सारे पानसरे...' एक ठिणगी पेटलेली!
पानसरेंवर पंचगंगा घाट, कोल्हापूर येथे अत्यंसंस्कार

अनेक पक्षांचे आणि विचारांचे बुद्धीजिवी नेते किंवा कार्यकर्ते हे समाजात मिसळताना दिसत नाहीत, त्यांच्या त्यांच्या वैचारिक विश्वातच ते मग्न असतात.. अशा काळात वैचारिकदृष्ट्या संपन्न असलेल्या पानसरेंनी त्यांचा मार्क्सवाद सामान्य माणसाला कळावा, यासाठी केलेली धडपड अधिक बोलकी आहे. एवढचं नाही तर उपेक्षितांचं आयुष्य उंचवण्यासाठी त्यांचा खटाटोप आणि समाजातल्या रुढींवर, परंपरांवर, जातीयवादावर त्यांनी केलेला हल्लाबोल.. हे करण्यासाठी वेगळी हिंमत्त असावी लागते         

माणूस गेला तरी विचार संपत नाही.. हे खरं पण ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात ओढवावी, यासारखं दुर्देवं ते काय.. दाभोलकरांचे मारेकरी आपल्या यंत्रणेला दीड वर्षांनंतर सापडू नयेत, आणि पानसरेंवर दिवसाढवळ्या गोळ्या झाल्या जाव्यात, आणि त्यांचेही हल्लेखोर सापडू नयेत.. यापेक्षा दुर्देवविलास काय असू शकतो..

महाराष्ट्रात काय आणि देशात चाललंय काय, असा अस्वस्थ करु पाहणारा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे.. चर्चा विकासाची व्हावी, वाद सकारात्मक असावेत की २१ व्या शतकाकडे जाताना आपण सगळे एका रानटी, पाशवी युगाकडे पुन्हा नव्याने जातो आहोत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती दिसते आहे.

राज्यात पानसरेंवरचा हल्ला असो की शिवाजी महाराज परिसंवादाच वाद की देशात लव्ह जिहाद, घरवापसी सारखे मुद्दे असोत वा साधू-संतांची वायफळ बडबड असो.. हे नव्यानं झालेलं सत्तांतर हे विकासाभिमुख देश असावा यासाठी जनतेनं केलेलं आहे हेच मदहोशीत रमलेली ही सरकारं विसरत चालली आहेत काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.. मिळालेला जनादेश हा सांस्कृतिक दहशतवाद पसरवून प्रगैतिहासिक काळात जाण्यासाठी नाही तर एका उज्ज्वल भविष्यासाठी आहे.. हेच भान हरपत चाललेलं नाही ना ?..

आता पानसरेंच्या हौतात्म्याचंही राजकारण होईल, उजवे-डावे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं हे सगळं वापरण्याचा प्रयत्न करतील, मोर्चे निघतील, आंदोलन होतील.. पण जो मुळात शोषित-पीडित व्यक्ती जो पानसरेंच्या नरजेसमोर होता.. जो सामाजिक कार्यकर्ता ज्यानं पानसरेंकडून ऊर्जा घेऊन हे काम सुरु केलं होतं.. ती मंडळी मात्र कायमची पोरकी झालीयेत..

काँम्रेड पानसरेंचं पार्थिव दसरा चौकात आणल्यानंतर, त्यांच्या कुटुंबियांचा आणि त्यांच्यावर प्रेम असणा-या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं दुख बघून, त्यांचा आक्रोश बघून, ज्याचे डोळे पाणावले नसतील, तो माणूसच नाही.. मग तो कुठल्या विचारांचा हा प्रश्नच उरत नाही..

मला वाटणारी अस्वस्थता ही आहे..   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.