'राम मंदिर, राम भरोसे' - भाग १

 'राम'बाणाचा लक्ष्यवेध

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 10, 2017, 05:37 PM IST
'राम मंदिर, राम भरोसे' - भाग १ title=

ब्लॉग :  'राम'बाणाचा लक्ष्यवेध

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्ता आली तर अयोध्येत राम मंदिराचा मार्ग चुटकीसरशी मोकळा करण्याचं वचन भारतीय जनता पक्षानं दिलं होतं. केंद्रात मोदी आले तर आता उत्तर प्रदेशात योगी विराजमान झाले. २०१९ च्या निवडणूकी आगोदर राम मंदिरावर तोडगा काढण्याचा कार्यक्रम भाजपनं आखला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी लगोलग सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून राम मंदिर खटला जलदगतीने सोडवण्याची विनंती केली. सुप्रीम कोर्टाने ही विनंती धुडकावून लावली. जोपर्यंत कोर्ट निर्णय देणार नाही तोपर्यंत राम मंदिराचा प्रश्न सुटणार नाही. परंतू राम मंदिर प्रकरणी खरंच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे का ? संसदेत कायदा आणून राम मंदिर उभारणे शक्य आहे का ? राम मंदिर वादग्रस्त जागेतील तिन्ही पक्षकारांना काय वाटतं ? यासह असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 'झी २४ तास'चे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी अयोध्येत पायपीट केली. तीचा हा अयोध्या 'आँखो देखी' रिपोर्ट 
...

अयोध्येत प्रवेश केल्यानंतर सर्वात अगोदर राम मंदीराचे मुख्य पुजारी  सत्येंद्र दास यांची भेट घेतली. सत्येंद्र दास यांच्या घराकडे निघालो... हनुमान गढी पासून काही अंतरावर गेल्यावर एका लहानशा गल्लीत प्रवेश केला. डाव्या बाजूलाच पिवळ्या रंगाच्या जुनी इमारतीवर सत्येंद्र दास यांच्या नावाची पाटी नजरेस पडली... आतमध्ये प्रवेश केला तर काहीसं पटांगण लागलं. सत्येंद्र दास पहिल्या मजल्यावर राहतात. मजला चढताना पाय-या अगदी जुन्या काळातील रूंद असल्याचं जाणवत होतं. घरात प्रवेश केला. घर अगदी साधं. साधं म्हणजे दोन खोल्या. एका खोलीत एक सत्येंद्र दास राहतात तर दुस-या खोलीत भगवान रामाचा देव्हारा... अंगावर भगवे वस्त्र घातलेले सत्येंद्र दास आले आणि म्हणाले बोलिए शिंदेजी कहां से आए आप ? मी म्हणालो, दिल्ली से... सत्येंद्र दास म्हणाले , दिल्ली में तो सिर्फ एक ही नाम गुंज रहा है... मी म्हणालो, कौनसा नाम. केजरीवाल या मोदी ? त्यावर हसत म्हणाले, "मोदीजी". आमच्या गप्पांना सुरूवात झाली... 

 Image result for ayodhya ram mandir zeenews
मशिद नव्हे, चुकून मंदिरचं पाडलं

मी त्यांना विचारलं सत्येंद्रजी राम मंदिरासाठी बाबरी मशिद पाडली गेली. त्यावर त्यांनी मला थांबवलं ते म्हणाले, बाबरी मशिद पाडली गेली नाही. खरं तर मंदिरच पाडलं गेलं. मी विचारलं कसं काय.. जेंव्हा १९९२ मध्ये राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून कारसेवक अयोध्येत आले. त्यावेळेस त्यांना मंदिर कोणतं आणि मशिद कोणती हे माहित नव्हती. त्यावेळी राजकारण्यांच्या भुलथापांमुळे लोकांचे मस्तक भडकले होते. अशावेळी त्यांनी बाबरी मशिद ऐवजी मंदिराचेच शिखर तोडले. आपल्या कार्यकर्त्यांमार्फत मशिद पाडल्याचा प्रचार करून राजकीय नेत्यांनी पोळी भाजून घेतली. त्यामुळे मशिद पाडली नाही तर मंदिरच पाडलं गेल्याचा दावा सत्येंद्र दास यांनी केला. याचा फायदा राजकीय नेत्यांना झाला आणि त्यांचं सरकार आलं. भाजपच्या राजकारणाला लोक बळी पडले का, या माझ्या प्रश्नावर त्यांनी लगेच होकार दर्शवला. ते म्हणाले, भगवान श्रीरामाच्या नावावर नेहमी राजकारण होत आलं आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मुद्दा केवळ मतदानासाठी वापरला जातो. 

मोदी पे भरोसा नहीं 

एकदा सत्ता हातात आली की, जनतेला दिलेल्या आश्वासनाची किंमत राहत नाही. सत्तेत असतानाही भाजपनं राम मंदिरासाठी काही काम केलं नाही. इतर पक्षाप्रमाणे भाजपनंही मतांचं राजकारण केलं असल्याचा आरोप राम मंदिराच्या मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी केला. धर्मनीतीमध्ये राजकारण आणून भाजपनं मोठी चूक केली. राम मंदिराला राजकारणात ओढण्याचे काम राजकारण्यांनी केलं असून नेत्यांनी राम मंदिरापासून दूर राहण्याचा सल्ला दास यांनी दिला. मी म्हटलं अब तो मोदीजी प्रधानमंत्री है, वो मंदिर बनवाऐंगे. त्यावर ते म्हणाले, सत्ता में आने के बाद कोई राम मंदिर बनाने के लिए कदम नही उठाता. नरेंद्र मोदी भी ऐसा ही करेंगे. मी विचारलं, मोदी पे आपको भरोसा नहीं है ? त्यावर ते म्हणाले, बिल्कुल विश्वास नाही. ज्यांना मोदींची कार्यशैली माहित आहे, ते कधीच मान्य करणार नाहीत. सध्या मोदींची प्रतिमा कट्टरवादाकडून विकासपुरूषाकडे जाणारी आहे. अशावेळी ते एखादं प्यादं पुढे करतील परंतू स्वत: राम मंदिर उभे करण्यासाठी तयारी दाखवणार नाही.
 

Image result for ayodhya ram mandir zeenews

'निर्मोहीं'चा मोह

रामजन्मभूमी प्रकरणी निर्मोही आखाडा याचिकाकर्ता आहे. सुप्रिम कोर्टानं रामजन्मभूमीत निर्मोही आखाडयाला वाटणी दिली आहे. त्यामुळे निर्मोही आखाडा राम मंदिरावर अधिकार सांगत आहे. परंतु निर्मोही आखाडा म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी मी निर्मोही आखाडाचे प्रमुख दिनेंद्र दास यांच्याकडे गेलो. राममंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या घरासमोरच निर्मोही आखाडा आहे. परंतू दोघांमधून विस्तवही जात नाही. निर्मोही आखाडा म्हणजे खरंच आखाडा. बाहेर लाल माती टाकून कुस्तीसाठी मोकळी जागा आहे.. मोठा वाड्यासारखा परिसर परंतू वर छप्पर नाही. वाड्यात मोकळा परिसर उजव्या बाजूला मंदिर.. डाव्या बाजूला भिंत आणि बाहेर पडण्यासाठी दुसरा दरवाजा आणि समोर आराम करण्यासाठी खोली. कोणी आहे का, असं विचारणा केल्यावर छोटंसं गेट उघडून एक पैलवान बाहेर आले. आश्रमात जशी रचना तशीच ओळीत तीन चार खाट लावलेले. त्यावर सगळे आराम करत होते. मी आल्यावर चौघेही उठले. तेवढ्यात एकाने ओळख करून दिली. हे महंत दिनेंद्र दास. हे निर्मोही आखाड्याचे पंच. म्हणजे प्रमुख. दिनेंद्र दास हे उठल्याबरोबर एकजणाने पाणी आणले. दुस-याने त्यांचा सदरा आणला.. तिस-याने स्टोव्ह पेटवला.. चहा बनवण्यास सुरूवात केली. यावरून दिनेंद्र दास यांचा दबदबा असल्याचे दिसून आले त्यांच्या डोक्यावरून कपाळावर व्रण दिसले. मी त्यांना सहजच विचारलं तुमच्या कपाळावर हे व्रण कसले. ते म्हणाले, आमचे मित्र कमी आणि शत्रू अधिक आहेत. कोणीतरी हल्ला केला होता. त्याच थोडक्यात वाचलो. त्यामुळे ख-या अर्थानं हा आखडा असल्याचं मनाला पटलं. निर्मोही आखाड्यात राहणारे कोणीही लग्न करत नाही. अविवाहीत राहुन देवाची सेवा केली जाते.

निर्मोही आखाड्याबद्दल मला आणखी नवीन माहिती कळाली.. देव आणि संतांना कोणत्याही गोष्टीचा त्रास असल्यास त्यांना संकटातून वाचविण्यासाठी निर्मोही आखाडयातील जवान तैनात असतात. दानव किंवा शत्रूंचे हल्ले परतावून लावण्यासाठी निर्मोही आखाडा सदैव तयार असते. निर्मोही आखाडा साधू संतांसाठी लष्कराचं काम करते. त्यांना कोणताच मोह नसतो म्हणून त्यांना निर्मोही म्हटलं जातं. ते केवळ सेवा करण्याच्या उद्देशाने आयुष्यभर काम करतात. निर्मोहींचा देव हनुमान आहे. हनुमानाने ज्या प्रमाणे मनांत कोणताही मोह न ठेवता भगवान रामाची भक्ती आणि सुरक्षा केली. त्याच मार्गावरून जाणारे निर्मोही आहेत. निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर आखाडा यांना देशभर मान आहे. फक्त अयोध्येचा विचार केला तर, निर्मोही आखाड्यात ९ गाव, निर्वाणी आखाड्यांतर्गत ७ तर दिगंबर आखाड्यांतर्गत २ गावे येतात. देशभरातून दोन वेळा बैठक होते आणि आखाड्याचा पंच कोण असावा हे सर्वजण ठरवतात.

निर्मोही विरूद्ध अशोक सिंघल

निर्मोही आखाड्यांच्या निवडणूकीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप आपआपल्या उमेदवारावा पाठींबा देतात. त्यांना निवडून आणण्याची राजकीय खेळी करतात. मात्र महंत दिनेंद्र दास हे कट्टर भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या विरोधातील. सत्येंद्र दास पुजारी असलेल्या रामलल्ला समितीला विश्व हिंदू परिषदेचा पाठींबा आहे. रामलल्ला समितीनं धोक्यानं ही जागा हडप केल्याचा आरोप दिनेंद्र दास करतात. रामलल्ला समितीला विश्व हिंदू परिषदेची साथ आहे. विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांनी निर्मोही आखाड्याला या राममंदिर वादातून बाहेर पडण्याची विनंती केली होती. परंतू निर्मोही आखाडाने आपला दावा सोडला नाही. त्यावेळी अशोक सिंघल यांनी निर्मोही आखाड्यात जाऊन पैशाचं अमिष दाखविलं. आगोदर १० लाख देऊ केले निर्मोही आखाडा केस मागे घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे सिंघल यांनी आकडा वाढवून ५० लाख रूपये देऊ केले. परंतू दिनेंद्र दास यांनी नकार दिला. धनशक्तीने काम झाले नाही म्हणून सिंघल यांनी निर्मोही आखाडाला धमकीही दिली. साम-दाम-दंड - भेद सर्व अस्त्र वापरले. सिंघल यांचा उद्देश स्पष्ट दिसून येत असल्यामुळे त्याचवेळी आखाड्यातून त्यांना हाकलून दिलं. निर्मोही अधिक आक्रमक झाले आणि सिंघल यांचा अपमान झाला. तेंव्हापासून अशोक सिंघल आणि निर्मोही आखाडा यांच्यात छत्तीसचा आकडा तयार झाला. सिंघल यांच्या अमिषाला बळी न पडता निर्मोही आखाडा यांनी राममंदिरावरील आपला दावा कायम ठेवला. सध्या निर्मोही आखाडा आर्थिक संकटातून जात आहे. मात्र, राम मंदिराचा ताबा मिळाला तर वर्षानुवर्षे उत्पन्नाची चिंता नाही. त्यामुळे निर्मोहींनासुद्धा मोह आवरता आला नाही.
 

Image result for ayodhya ram mandir zeenews

मशिदीची जागा की भक्तांची श्रद्धा ?

राम मंदिरातील याचिकाकर्ते आणि हाजी मेहमूद या वादाला भाजप आणि विश्व हिंदू परिषदेला जबाबदार धरतात. अलाहाबाद हायकोर्टानंसुद्धा राम मंदिर भावनेचा आणि श्रद्धेचा विषय असल्याचं सांगितले आहे. परंतू हा श्रद्धेचा विषय नसून जागेचा प्रश्न असल्याचा दावा हाजी मेहमूद करतात. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर मेहमूद समाधानी नाहीत. या मुद्दयाचं राजकारण होऊ नये, अशी भावना ते व्यक्त करतात. 

मी त्यांना विचारलं, या जागेत राम मंदिर बनायला हवं का.. यावर हाजी म्हणाले, राम मंदिर बनायला हवं परंतू वादग्रस्त जागेत नको. हवं तर बाजूला राम मंदिर उभारलं तरी काही हरकत नाही. दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी हे मशिद सरयू नदीच्या पलिकडे बांधण्याची विनंती करत आहेत. खरं तर शरयू नदी अयोध्येच्या बाहेर आहे. शरयू नदीच्या पलिकडे मशिद उभी करणं म्हणजे अयोध्येच्या बाहेर जाण्यासारखं आहे. 

या मुद्द्यालाही हाजी मेहमूद विरोध करत आहेत. आगोदर अशोक सिंघल आणि आता सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराचा मुद्दा चिघळवला असल्याचा आरोपही मेहमूद करतात. अयोध्येतील लोक शांतताप्रिय आहेत. पण कधी रथयात्रा तर शस्त्रांचे प्रशिक्षण देऊन विश्व हिंदू परिषद दोन्ही समाजात तणाव निर्माण काम करत आहे.

समाजवादी पार्टीनेही तेच केलं. भाजप आणि विश्व हिंदू परिषदेनं हिंदूंना भडकवण्याचं काम केले तर समाजवादी पार्टीने मुस्लिमांना भडकवले. समाजवादी पार्टीचं सरकार असताना मुलायम सिंग यांनीच दंगे घडवले. त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाला. हा वाद केवळ अयोध्येपुरता मर्यादीत नव्हता. तर, देशभर पडसाद पडले. 

भाजपनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण केलं तर मुलायम सिंग यांनीही मुस्लिमांचा कैवारी असल्याचं दाखवून आपलं इप्सित साध्य केलं. संसदेत राम मंदिर संदर्भात कायदा आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचं त्यांना विचारलं. 

त्यावर, असा कोणताही कायदा आणता येणार नाही आणि आणलाच तरी आमचा त्याला विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका हाजी मेहमूद यांनी घेतली आहे. कारण हा भावना, मंदिर, मशिद किंवा श्रद्धेचे मुद्दा नसून केवळ जमिनीचा वाद आहे. जसा शेती, जमीनीच्या मालकीचा वाद तर नात्यातही सुरू असतो. तसाच हा वाद आहे. यात इतर दोन पक्षकारही आहेत. परंतू याला श्रद्धेचा मुलामा देऊन संपूर्ण धर्माला यात ओढले गेले आहे.
 

Image result for ayodhya ram mandir zeenews

राम मंदिरावर अधिकार कोणाचा...यावर तिन्ही पक्षकारांशी चर्चा केल्यानंतर तिघांचेही तीन मुद्दे पुढे आले...

१. सत्येंद्र दास यांचं म्हणणं होतं, जर मंदिराची पूजा पुजारी करत असेल तर मंदिरावर अधिकार त्या पुजा-याचा म्हणजेच रामलल्ला समितीचा असायला हवा.

२. निर्मोही आखाड्याचे दिनेंद्र दास म्हणतात, रामाची पूजा कोणीही करू द्या परंतू देवांची सुरक्षा आमच्याकडे आहे. घराच्या चारही भिंती आमच्या तर मंदिरावर अधिकार कोणाचा, कोप-यात पूजा करणा-या पुजा-याचा की आमचा ? कोणीही सांगेल चार भिंती ज्याच्याकडे त्याचाच अधिकार असेल.

३. वक्फ बोर्डाच्या हाजी मेहमूद म्हणतात, राममंदिराची पूजा कोणीही करू द्या, मंदिराच्या चार भिंती कोणाच्याही ताब्यात असू द्या. ज्या जागेवर मंदिर किंवा मशिद उभे आहे ती जागा कोणाची आहे ?  जागाच जर आमची असेल तर पुजास्थळ आणि मंदिराच्या चार भिंतींचा प्रश्नच कुठे उरतो.

राम मंदीराचे शिवधनुष्य कोण पेलणार ?

या तिन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यावर तोडगा काढणे कठिण असल्याचे दिसते. अलाहाबाद हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेईल. परंतू तिन्ही पक्षकार एक पाऊल मागे घेण्यासाठी तयार नाहीत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणाचाही हस्तक्षेप नको आहे. अशा परिस्थितीत अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग आणखीनच कठीण होताना दिसत आहे. 

कोर्ट आणि सरकार दोघांपैकी कोणीही निर्णय घेतला तरी तो निर्णय कोट्यावधी जनतेंवर परिणाम करणारा असणार आहे. योगी आल्यानंतर मात्र गणितं बदलली आहेत. मोदी नव्हे परंतू योगी नक्कीच राम मंदिर उभे करतील, असा आशावाद तयार झाला आहे. राम मंदिर संदर्भात मोदींवरील विश्वास कमी झाल्याचे हे लक्षण आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांच्याच हाती असते. उत्तर प्रदेशातील पोलिस यंत्रणा हातात असेल तर कोणतंही काम अशक्य नाही. 

आता तर युपी पोलिस योगींच्या हातात आहे. राम मंदिराचे तारणहार म्हणून योगींकडे पाहिले जात आहे. राम मंदिर बांधण्याचं शिवधनुष्य मोदी पेलणार की योगी, हे येत्या काळात दिसेल. परंतू हे शिवधनुष्य पेलताना दोन धर्मात आणखी तेढ वाढू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. योगी आल्यामुळे राम मंदिराच्या आशा वाढल्या आहेत. योगींचा दृढ निश्चिय प्रत्यक्षात कृतीत येण्यासाठी वेळ लागेल. सध्या तरी 'राम मंदिर.. राम भरोसे..' असंच म्हणावे लागत आहे.

क्रमश: