मुंबई : (जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यात गणेशोत्सव थाटामाटाने आणि उत्साहाने साजरा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यावरचं दुष्काळाचं संकट दूर व्हावं, ही सर्वांची भावना आहे. मुंबई आणि पुण्यातील बहुसंख्य संवेदनशील लोकांना, ग्रामीण भागात दुष्काळाचा सामना करणाऱ्या लोकांची चिंता होतेय.
काही गणेश मंडळांनी दुष्काळासाठी दानपेटीत आलेली रक्कम, दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचं जाहीर केलंय. ही एक चांगली सुरूवात म्हणता येईल.
दुष्काळाला कायमचं घालवण्यासाठी
मात्र सध्या राज्याला कायमचं दुष्काळाच्या सापळ्यातून बाहेर काढायचं असेल, तर जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे. जलयुक्त शिवार ही योजना सध्या शासनाकडून राबवली जात आहे. यापूर्वी याला पाणलोट विकास किंवा पाणी अडवा पाणी जिरवा देखील म्हणायचे.
राज्यात अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेची कामं सुरू आहेत. ही योजना निश्चितच जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. मात्र ही योजना एकाच वेळेस सर्वच गावांना राबवणं सरकारला शक्य नाही.
लोकांचा उत्साह, शासन निरूत्साही
जळगाव जिल्ह्यातील दहिवद तालुका अमळनेर या गावात लोकांनी शासनाकडे जलयुक्त शिवाराची मागणी केली, पण त्यांना शासन दरबारातून कोणतीही मदतीची हाक आली नाही, जलयुक्तसाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद होता. मात्र शासनाने या गावाचं नाव जलयुक्तसाठी घेतलंच नाही, गावात आता पाण्याची भीषण परिस्थिती आहे. म्हणून गणेश मंडळांनी अशा गावात बिगर सरकारी जलयुक्त शिवार योजना राबवली तर क्रांती होईल.
पुढाऱ्यांच्या गावात जलयुक्त शिवार योजना
बहुतेक ठिकाणी ही योजना पुढाऱ्यांच्या गावात राबवली जात असल्याचं चित्र आहे. म्हणून गणेश मंडळांनी बिगर सरकारी जलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी एका मंडळाने एक गाव दत्तक घेणे आवश्यक आहे. यासाठी गणेश मंडळांना गावातील इच्छूक तरूणांची मोठी साथ मिळेल यात शंकाच नाही.
मुंबई पुण्यातील गणेश मंडळांनी जर ग्रामीण भागातील गावं दत्तक घेतली आणि गावातील पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधले, गणेश मंडळांच्या माध्यमातून ही मोठी जलक्रांती उदयास येईल.
गणेश मंडळ करू शकतात जलक्रांती
एका गावात साधारणत: 10 लाखात जलयुक्त शिवाराचं मोठं काम होऊ शकतं. यामुळे एका गावाचा पाणी प्रश्न दहा वर्षांसाठी सुटू शकतो, क्षारयुक्त पाण्यामुळे ग्रामीण भागात लोकांना किडनी आणि त्यासारख्या अनेक आजारांनी ग्रासलंय त्यातून त्यांची मुक्तता होऊ शकते, तेव्हा गणेश मंडळांनी जलयुक्त शिवारासाठी एक-एक गाव दत्तक घेण्याची तयारी करावी आणि जलक्रांती घडवावी. jaywinpatil@gmail.com
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.