अटल बिहारी वाजपेयी... प्रवास एका झंझावाताचा!

२५ डिसेंबर, १९२४ ला सुरु झाला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या या झंझावाताचा प्रवास...

Updated: Aug 16, 2018, 11:22 AM IST
अटल बिहारी वाजपेयी... प्रवास एका झंझावाताचा! title=

प्रकाश दांडगे,

झी मीडिया, मुंबई

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं एक बुलंद व्यक्तिमत्व...

आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वानं देशाची प्रगती साधणारा पंतप्रधान...

जगभरच्या नेत्यांशी संवाद साधत विश्वबंधुत्वासाठी झटणारा एक मुत्सद्दी...

आपल्या वाणीनं करोडोंना मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता...

काव्यशास्त्र विनोदात  रमणारा कवी मनाचा राजकारणी... 

अशा कितीतरी रुपांनी अटल बिहारी वाजपेयींना भारतीयच नव्हे तर जागतिक  राजकारणावर आपल्या कर्तृत्वानं अमिट असा ठसा उमटवलाय... 

२५ डिसेंबर, १९२४ ला सुरु झाला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या या झंझावाताचा प्रवास...


तरुणपणातले वाजपेयी 

 
१९५१ पासून भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी १९५७ मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. भारतीय जन संघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वीपणे केला. सत्तेत असो किंवा नसो, चार दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. नऊ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या वाजपेयींना दुसऱ्या लोकसभेपासून १३ व्या लोकसभेपर्यंत आपली छाप पाडली. खासदार म्हणून संसद गाजवणारे अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा मंत्री झाले ते जनता सरकारच्या काळात... पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी १९७७ ते १९७९ या काळात यशस्वीपणे पेलली.

पंतप्रधान वाजपेयी 

१६ मे १९९६ हा दिवस ऐतिहासिक महत्त्वाचा ठरला... याच दिवशी अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पण लोकसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यानं त्यावेळचं वाजपेयी सरकार केवळ तेरा दिवस टिकलं. ३१ मे १९९६ ला वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला. पण हिंमत न हारता वाजपेयी पुन्हा लोकांना सामोरे गेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा १९९८ मध्ये सत्तेत आली. पण राजकीय घटनाक्रमानं वेगळं वळण घेतलं आणि वाजपेयी सरकार पुन्हा अल्पमतात गेलं. १६ एप्रिल १९९९ ला आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी वाजपेयी सरकारला अपेक्षित पाठिंबा दिला नाही आणि केवळ एका मतानं वाजपेयी सरकार गडगडलं. याची खंत मतदारांना होती. 

अटल बिहारी वाजपेयी १३ व्या लोकसभेत प्रवेश केला तोच मोठी अपेक्षा ठेवत. वाजपेयी तब्बल नऊ वेळा खासदार म्हणून विजयी झाले होते यावेळी  ते पुन्हा पंतप्रधान बनले. १३ ऑक्टोबर १९९९ ला अटल बिहारी वाजपेयींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हा कार्यकाळ १३ मे २००४ पर्यंत टिकला. एकूण तीन वेळा वाजपेयी पंतप्रधान झाले. वाजपेयींचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला... आपल्या ठाम नेतृत्वाची झलक अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात दाखवून दिली...

१३ मे १९९८ : पोखरण

अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारतानं पोखरण इथं अणुचाचणी घडवून आणली. पंतप्रधान झाल्यावर केवळ एक महिन्याच्या आत वाजपेयींनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी सारा देश वाजपेयींच्या मागे उभा राहिला... अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघानं  भारतावर निर्बंधही लादले पण आर्थिक आघाडीवर पावलं उचलत वाजपेयींनी देशाला त्याची झळ लागू दिली नाही. भारत एक महाशक्ती म्हणून जगात उभा राहण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले... सगळ्यांशी मैत्री राखत जागतिक शांततेसाठी योगदान देणे हाच वाजपेयींच्या नेतृत्वचा अग्रक्रम होता... पाकिस्तानसोबतही वाजपेयींना मैत्रीचे संबंध हवे होते. त्यामुळेच फेब्रुवारी १९९९ ला लाहोर दिल्ली बस सेवा सुरु केली.

एकीकडे वाजपेयी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत असतानाच पाकिस्ताननं मात्र काश्मिरमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषेजवळच्या टेकडयांवर चढाई केली. १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान पंतप्रधान वाजपेयींनी आपल्या सैनिकांच्या पाठिशी खंबिरपणे उभं रहात देशाच्या सीमांचं संरक्षण केलं... ऑपरेशन विजय यशस्वी करत वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जीवाची बाजी लावत आपल्या जाबाँज सैनिकांनी घुसखोरांना सीमेपार पळवून  लावलं. पाकिस्तानचा डाव उधळून लावत भारताचा तिरंगा वाजपेयींनी फडकता ठेवला...

वाजपेयी सरकारच्या काळात देशानं काही महत्त्वाच्या संकटांचाही सामना  केला. १९९९ मध्ये तालिबान अतिरेक्यांनी विमान अपहरण करुन भारत सरकारला कोंडित पकडलं. अखेर तीन अतिरेक्यांच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका करुन घेण्यात वाजपेयी सरकार यशस्वी झालं. त्यावेळी टीकेचा सामनाही सरकारला करावा लागला. २००१ मध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला आणि सगळा देश हादरला. या दोन्ही घटना पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणाऱ्या ठरल्या. अशा अनेक संकटांचा सामना करत अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली देशानं वाटचाल केली.

भाजपचा सर्वसमावेशक चेहरा

पण भाजपचा एक सर्वसमावेशक चेहरा अशीच अटल बिहारी वाजपेयींची खरी ओळख होती. दंगलीत होरपळत असलेल्या गुजरातमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राजधर्माची आठवण करुन देणारे अटल बिहारी वाजपेयीचं होते...

विरोधकांचे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीबद्दल आक्षेप असले तरी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताचं हित जपलं जाईल, याची विरोधकांनाही खात्री वाटत असे. जागतिक मंदीच्या काळात भारतानं वाजपेयींच्या काळात ५.८ टक्के विकासदर गाठला होता. कृषी क्षेत्राचं उत्पादन वाढतं होतं... परकीय चलनाची गंगाजळीही समाधानकारक होती. रस्ते विकासाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रमही वाजपेयींच्याच काळात हाती घेण्यात आला.

करिश्माई नेतृत्व

सत्तेबाहेर गेलेल्या  नेत्याला लोक विसरतात हा समजही वाजपेयींनी खोटा ठरवला. सक्रीय राजकारणापासून दुर गेल्यावरही अटल बिहारी वाजपेयींना जनता विसरली नाही. आज पूर्ण बहुमतानं सत्तेत आल्यावरही अटल बिहारी वाजपेयींची आठवण काढली जाते. नेहरु गांधी घराण्याच्या वलयाला भेदत अटल बिहारी वाजपेयीनी आपलं नेतृत्व उभं केलंय. कारण अटल बिहारी वाजपेयी म्हणजे आहे एक करिश्मा असलेलं नेतृत्व.. जणू प्रत्यक्ष सरस्वतीच बोलते आहे असं वाटणारं ते अमोघ वक्तृत्व... ते आश्वासक स्मित... ती ज्याज्वल्य देशनिष्टा... संसदेत एक जबाबदार आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून गाजवलेलं कर्तृत्व... अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कतृत्वानं करोडे भारतीयांची मनं जिंकली आहेत हेचं खरं...

स्वकर्तृत्वाच्या जोरावर... 

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व... नेहरु गांधी घराण्याच्या परिघाबाहेरच्या या नेत्यानं एका सर्वसाधारण परिवारात जन्म घेत तीनदा पंतप्रधान होण्याचा मान स्वकर्तृत्वावर मिळवलाय. 

*HD* Atal Bihari Vajpayee Rare Old Photos (Black & White photos) - atal bihari vajpayee,vajpayee,india,politician,prime minister
वाजपेयींचा एक दुर्मिळ फोटो

अटल बिहारी वाजपेयींचा जन्म ग्वाल्हेरचा. एका शिक्षकाच्या घरात २५ डिसेंबर १९२४ ला वाजपेयींचा जन्म झाला. वडिल कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आई कृष्णा देवींच्या या मुलाचं बालपण मध्यमवर्गीय वातावरणात गेलं. वाजपेयी शिकले ते ग्वॉल्हेरच्या त्यावेळच्या व्हिक्टोरिया कॉलेजात. आता लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून हे कॉलेज ओळखलं जातं. पुढे कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून वाजपेयी राज्य शास्त्रात एम ए झाले. आयुष्यभर अविवाहित राहिलेले वाजपेयी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पांचजन्य, स्वदेश आणि वीर अर्जुन या दैनिकांचं संपादन वाजपेयींनी  केलं होतं.

पुढे १९५१ ला स्थापन झालेल्या भारतीय जन संघाचे वाजपेयी संस्थापक सदस्य होते. वाजपेयींचा राजकारणातला सुरुवातीचा काळ खडतर होता. सुरवातीला लखनौतून लोकसभेची पोट निवडणूक वाजपेयी हरले होते. १९५७ मध्ये वाजपेयींना भारतीय जनसंघानं लखनौ, मथुरा आणि बलरामपूर अशा तीन मतदार संघांमधून मैदानात उतरवलं होतं. लखनौतून वाजपेयींचा पराभव झाला. मथुरा मतदारसंघात तर त्यांची जमानत रक्कमच जप्त झाली. पण बलरामपूर लोकसभा मतदार संघातून विजयी होत वाजपेयी १९५७ मध्ये पहिल्यांदा संसदेत पोहोचले. वाजपेयींच्या चार दशकांपेक्षा जास्त काळाच्या संसदीय कारकिर्दीची ही सुरुवात होती.

फक्त संसदेतच नव्हे तर पक्षबांधणीतही वाजपेयींनी आपलं कर्तृत्व गाजवलं. १९६८ ते १९७३ या काळात ते भारतीय जन संघाचे अध्यक्ष होते. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणी विरोधात अटल बिहारी वाजपेयी खंबीरपणे उभे राहिले. आणीबाणीच्या काळात वाजपेयींनी तुरुंगवासही भोगला. पण पक्ष कार्यात खंड पडला नाही.

पुढे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून १९७७ ते १९८० या काळात वाजपेयींनी पक्षबांधणीचे काम केलं. २०१४ मध्ये पूर्ण बहुमतात सत्तेत आलेल्या भाजपच्या सुरुवातीच्या दिवसांची पायाभरणी करण्यात वाजपेयींचा मोलाचा वाटा होता. १९८० ते १९८६ या अवघड काळात वाजपेयींनी भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा  सांभाळली. भाजप संसदीय पक्षाचं नेतेपदही वाजपेयींनी १९८० ते १९९६ या काळात वेळोवेळी प्रभावीपणे सांभाळलं.

अकराव्या लोकसभेत वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्षात असताना वाजपेयी सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर धारेवर धरत, दुसऱ्या लोकसभेपासून तेराव्या लोकसभेपर्यंत वाजपेयी खासदार होते. उत्तम संसदपटू अशी ओळख असलेले वाजपेयी थोडा वेळ संसदेबाहेरही होते. १९८४ मध्ये ग्वॉल्हेर मतदारसंघात वाजपेयींचा माधवराव शिंदेंनी पराभव केला होता. त्याकाळात संसदेच्या चर्चांदरम्यान वाजपेयींची अनुपस्थिती विशेष करुन जाणवत असे. मात्र पुढे पुन्हा वाजपेयी संसदेत परतले आणि पंतप्रधानही झाले.

भारतीय जन संघ आणि पुढे भारतीय जनता पार्टीला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. या दोन्ही पक्षांच्या जडणघडणीत आणि विस्तारात वाजपेयींच्या नेतृत्वाचा मोठा हात आहे. एकेकाळी लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचं नेतृत्व हीच भाजपची ओळख होती.प्रतिकूल परिस्थितीत जनसंघ आणि पुढे भाजपला दिशा देत सत्तेचे दिवस दाखवणारं सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटल बिहारी वाजपेयींची ओळख राहील.


 

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी...

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक...

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे काव्यशास्त्र विनोद करत जीवन समरसून जगलेला एक जिंदादिल माणूस...

जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज  यहाँ कल कहाँ कुच है

कौन जानता किधर सवेरा...

अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणाच्या रणधुमाळीतही आपली चिंतनशिलता अशी जिवंत ठेवली. 'मेरी इक्यावन कविताएं' हा वाजपेयींचा गाजलेला कवितासंग्रह... आणीबाणीत जेलमध्ये असतानाही वाजपेयींनी कविता लिहिल्या... जीवनातला एक एक टप्पा पार करतानाही त्यांचं शिखरावरचं लक्ष हटलं नव्हतं... भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला नवी दिशा देत होती... थबकलेल्यांना जणू त्यांची कविता इशाराच देत होती... 

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के  मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिरसे दिया जलाएँ...

आपल्या वाणीनं  सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे वाजपेयी तसे मितभाषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना निसर्गात  रमायला आवडतं. निसर्गाची विविध रुपं त्यांना साद घालायची... वाजपेयींना संगीत आवडत होतं.. राजकारणाच्या  धावपळीतही शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं आयोजन वाजपेयी आपल्या घरी करत असतं... भीमसेन जोशी त्यांचे आवडते गायक होते... पुण्यातल्या  राजभवनावर भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असताना झाली होती. पण असा का कवी मनाचा माणूस प्रसंग आला तर व्रजासारखा कठोरही होतो... कारगिल युद्धाच्या वेळी वाजपेयींनी हा खंबीरपणा दाखवला. 

दांव पर सब कुछ लगा है

रुक नही सकते, टूट  सकते

है मगर हम  झुक नही सकते...

हा वाजपेयींचा कवितेप्रमाणेच जगण्याचाही बाणा 

वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्यावर दबाव होता.. वाजपेयींचा सर्वसमावेश चेहरा  अनेकांना डाचत होता.. पण वाजपेयी दबावाला बळी पडले नाहीत..'न मै टायर्ड हूँस न मै रिटायर्ड हूँ' असं ठणकावून सांगत त्यांनी पक्षातील विरोधकांना वठणीवर आणलं होतं. असा हा कवीमनाचा पण खंबिर राजकारणी... 

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ 

गीत नया गाता हूँ 

ही फक्त वाजपेयींची कविताच नाही तर तो जगण्याचा श्वासही ठरला

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.