www.24taas.com, मुंबई
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभु असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणूनगणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक- शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. हेरंब नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासुन आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.
वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक दाताचे उत्पाटन केले. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वाविघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले
गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम्हवामहे... व विषु सीदा गणपते..) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.
ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतीही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.
दुसर्या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.