www.24taas.com, मुंबई
शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर त्यांचं भाषण व्हिडिओद्वारे ऐकवण्यात आलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. बाळासाहेबांच्या भाषणानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली होती. पण एक मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंना काय वाटतं हे त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
`शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातील शिवसेनाप्रमुखांचे भावस्पर्शी भाषण ऐकून मी गहिवरून गेलो. त्यांच्या प्रकृतीची मलाही काळजी आहे. शिवसेनाप्रमुख स्वस्थ व्हावेत अशी समस्त जनतेप्रमाणेचे माझीही इच्छा आहे`, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे खडे बोलही त्यांनी सुनावले.
दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी प्रकृती अस्वस्थ असतानाही शिवसैनिकांशी सीडीच्या माध्यमातून संवाद साधला. आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय चालले आहे हे राष्ट्रवादीने बघावे असा पलटवार त्यांनी केला.