शिक्षणासाठी बनवलं गुलाबी रंगाचं खेडं

शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एका शिक्षक अवलियाने शिक्षणासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं. ही वास्तवातील घटना आहे, जालना जिल्ह्यातील एका गणेशपूर खेड्यातील.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 19, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com,जालना
‘स्वदेश’ हा हिंदी चित्रपट आठवतोय. त्यातील मोहन भार्गवची (शाहरूख खान) वीज निर्मितीची धडपड. गावातील लोकांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी किती मेहनत घेतली ती. तसाच प्रकार महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात घडला आहे. शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एका शिक्षक अवलियाने शिक्षणासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं. ही वास्तवातील घटना आहे.

गाव गणेशपूर. याच गावातील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे. सोनवणे यांनी गावाचा शैक्षणिक कायापालट करण्यासाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च केलेत. आपलं खेडं बदलून टाकण्यासाठी त्यांना एका ध्येयाने झापाटलं होतं. महात्मा गांधी म्हणायचे, खेड्याकडे चला. खेड्याचा विकास करा. तिच बाब प्रफुल्ल सोनवणे यांनी मनावर घेतली नाही तर स्वत:च पुढाकार घेऊन त्याची अंमलबजावणी केली. त्यांनी शिक्षणासाठी गुलाबी रंगाचं खेडं उभं केलं.
आपल्या खेड्यातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, खेडं शिक्षणाने स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी नवी शक्कल लढविली आणि ती यशस्वी करून दाखविली. स्वखर्चाने सर्व घरांच्या भिंतीवर शालेय अभ्यासक्रम रेखाटलाय. याचा चांगलाच परिणाम दिसून आलाय. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण्याची गोडी निर्माण झाली. शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये शिक्षणाबद्दल असणारे दडपण दूर झाले आहे.
सोनवणे यांच्या या उपक्रमामुळे घरांच्या भिंती बोलू लागल्या आहेत. विविध भौमितिक आकार, आकृत्या, इंग्रजी शब्द, अक्षर ओळख, शब्दार्थ, वनस्पतींचे अवयव आणि त्यांचे उपयोग, ज्ञानेंद्रिय, समसंख्या, विषम संख्या, चढता-उतरताक्रम, जलचक्र, ऋतूचक्र यासारख्या अनेक घटकांचे लेखन स्वत: आकर्षक रंगांनी रंगवले आहे. या उपक्रमामुळे गावातील मुलांना सहजपणे शैक्षणिक धडे मिळतात. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या ज्ञानाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत.
जालन्यापासून ७५ तर तालुक्याचे ठिकाण परतूरपासून १५ किलोमीटर अंतरावर गणेशपूर गाव आहे. गावात जवळपास ७० उंबरे असून लोकसंख्या ५००च्या आसपास आहे. गाव तसं छोटं, पण शिक्षणाच्या बाबतीत मागे होते. प्रफुल्ल सोनवणे या ध्येयवेड्या शिक्षकांने शिक्षणाची बिजे रोवण्यासाठी हा नवा उपक्रम हाती घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. स्वखर्चातून त्यांनी गावात `एक गाव-एक रंग` हा अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमासाठी सोनवणे यांनी स्वत: दहा हजार रुपये खर्च केलेत. शिक्षणासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला. ग्रामस्थांनीही दहा हजार रुपये दिलेत. `गुलाबी खेडे` अशी ओळख या गावाची झाली असून शिक्षणाची ज्ञानगंगाच या गावात वाहत आहे.