www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही. एकूण जलसाठ्यात सध्या फक्त १२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे वरच्या धरणांमधून आताच जायकवाडीसाठी पाणी सोडावं, ही मागणी जोर धरू लागलीय. याबाबत हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आलीय.
मराठवाड्यात पावसानं सरासरी ओलांडलीय. पण, प्रत्यक्षात धरणक्षेत्रात पाऊस तसा पडलाच नाही. जीवनदायी जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यावरच आहे. त्यामुळे गेल्यावर्षीची दुष्काळाची स्थिती पाहता जायकवाडी धरणासाठी आताच पावसाळ्यात पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागलीय. जायकवाडी जलाशयात सप्टेंबर अखेरपर्यंत ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध होईल अशी सरकारनं व्यवस्था करावी, या मागणीसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. ‘ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल’ असा इशारा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलाय.
केवळ जायकवाडी नाही तर मराठवाड्यातल्या सर्वच जलाशयांची अवस्था वाईट आहे. जायकवाडी धरणाची क्षमता २ हजार १७१ दशलक्ष घनमीटर असून यापैकी शून्य टक्के साठा सध्या उपयोगी आहे. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा येलदरी आणि निम्न दुधना धरणाचीही हीच परिस्थिती आहे. पूर्णा सिद्धेश्वर धरणाचा १० टक्केचा साठा सध्या पिण्यायोग्य आहे. बीड जिल्ह्यातल्या मांजरा, माजलगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या निम्न तेरणा, सीना कोळेगाव या धरणातलाही शून्य टक्के साठा सध्या पिण्यासाठी योग्य आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मनार धरणाचा १७ टक्केच साठा सध्या उपयोगी असून उर्ध्व पैनगंगा धरणाचा ५४ टक्के तर विष्णुपूरी धरणाचा ९० टक्के साठा पिण्यासाठी योग्य आहे.
ही परिस्थिती पाहता मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसाची गरज असल्याचं स्पष्ट आहे. मराठवाड्यात अजूनही ७२८ पेक्षा जास्त टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. विदर्भातील आमदारांनी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. याच पद्धतीने आता मराठवाड्यातील आमदारांनी पाणी प्रश्न लढण्याची गरज निर्माण झालीय. त्यामुळे भर पावसाळ्यातच मराठवाड्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.